काटी / प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पिंपळा (बुद्रुक) ते तामलवाडी रस्त्याला मंजुरी असताना प्रत्यक्ष कामाला मुहुर्त मिळत नसल्याने या मार्गावर प्रवाशांचे हाल कायम आहेत. त्यामुळे येत्या 1 ऑक्टोंबरपर्यंत रस्ताकामाला सुरुवात न झाल्यास तामलवाडी येथे उपोषण आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तुुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी दिला आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बुद्रुक) ते तामलवाडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतन मंजूर झालेले आहे. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यामुळे शेतकरी, शाळकरी मुले तसेच गरोदर महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम 1 ऑक्टोंबरपर्यंत सुरू न केल्यास तामलवाडी येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे. 

राजकीय पुढार्‍याचा रस्त्याला खोडा?

पिंपळा (बुद्रुक) ते तामलवाडी रस्त्याचे काम एका राजकीय पुढार्‍याच्या सांगण्यावरून थांबविण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस तुुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केला आहे. राजकीय हित साधण्यासाठी असा प्रकार केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 
Top