उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत आधार प्रामाणीकरण करुनही जिल्ह्यातील 972 शेतकर्‍यांची कर्जमाफीची रक्कम बँकेस वर्ग झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी मुंबई येथे राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात संजय दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2019 अन्यवये राज्यातील शेतकर्‍यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी चालू आहे. सदर योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 21 सप्टेंबर 2021 पर्यंत 72.962 लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 71.290 शेतकर्‍यांनी आधार प्रामाणीकरण पुर्ण केले असून त्यापैकी 70.318 शेतकर्‍यांचे कर्ज खात्यावर रक्कम रुपये 508 कोटी 98 लाख रुपये जमा करण्यात आलेली आहे. आधार प्रामाणीकरण झालेनंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करण्यात येते.

आज रोजी आधार प्रामाणीकरण करुनही 972 शेतकर्‍यांची कर्जमाफीची रक्कम बँकेस वर्ग झालेली नाही. याबाबत मुंबई येथील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज योजना यंत्रणेशी संपर्क साधला असता सदरील विभागाकडून छाननीसाठी पेमेंट प्रलंबित असल्याचे कळविण्यात येत आहे. तसेच माहे मे 2021 पासून या योजनेअंतर्गत रक्कम वर्ग झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना नवीन कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत. तरी आधार प्रामाणीकरण केलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफीची रक्कम बँकेस देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी संजय दुधगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

 
Top