उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात ज्या ज्या ठिकाणी स्वतंत्र विद्यापीठाबाबत निर्णय घ्यायचा आहे तो डाॅ.रघुनाथ माशेलकर यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यामंत्र्यासोबत बैठक घेऊन स्वतंत्र विद्यापीठाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शुक्रवार दि. १३ ऑगस्ट रोजी मंत्री सामंत उस्मानाबाद मध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शैक्षणीक पात्रता वाढविण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे एमपीएस्सी व युपीएस्सी परिक्षेच्या तयारीसाठी उस्मानाबादेत दोन सेंटर सुरू करणार असून त्यासाठी ५ कोटी रुपये देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. 

उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात कधी रूपांतर होणार  या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता मंत्री सामंत यांनी केंद्र सरकारचे नवीन शैक्षणीक धोरण येत आहे. त्याचा अभ्यास करून व डॉ.रघूनाथ माशेलकर यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन राज्यातील अनेक उपकेंद्राबाबत पुर्ण विद्यापीठाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. 

३० टक्के लसीकरणानंतरच महाविद्यालय सुरू होणार 

राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी ज्या महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, स्टाफ यांचे दोन्ही डोसचे ३० टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे व त्या महाविद्यालयाचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानंतर जिल्हाधिकारी महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतील, असे सामंत यांनी सांगितले. 

गुन्हे दाखल करणार

 ज्या संस्था किंवा बँका, अधिकारी, कर्मचारी नियुक्त करताना कोरोना कार्यकाळातील पदवीधरांना पात्रतेच्या निकषामध्ये बसवून सुध्दा घेत नसतील किंवा जाहिरातीमध्ये कोरोना कार्यकाळातील पदवीधर नाकारतील, अशा संस्थेवर किंवा बँकेवर राज्य सरकार गुन्हे दाखल करेल, असा इशारा ही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

 
Top