उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे येत्या 13 ऑगस्ट 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  या दौऱ्यात मंत्री सामंत उस्मानाबाद येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात कधी रूपांतर करणार याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार ने कांही वर्षांपुर्वी प्रत्येक जिल्हयात विद्यापीठ असणे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे विद्यापीठ उपकेंद्रास १० वर्ष झाल्यानंतर त्याचे पुर्णविद्यापीठात रूपांतर करावे, अशी गाईडलाईन दिली आहे. 

विशेष म्हणजे उसमानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रास १८ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. सरकारच्या पातळीवर या उपकेंद्रास पुर्ण विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी कांहीच हालचाल झाली नाही, पुर्ण विद्यापीठासाठी ज्या कांही इमारती व विभाग आवश्यक आहेत. त्याची पुर्तता सिनेट मेंबर संजय निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या कांही वर्षांपासून केली आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करायचे झाले तर सरकार पातळीवर जास्त खर्च येणार नाही. मध्यतंरी या उपकेंद्राचे पुर्णविद्यापीठात रूपांतर करण्यासाठी एक समितीचे गठण करण्यात आले होते. परंतू त्या समितीचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.  त्यामुळे मंत्री सामंत यांच्या १३ ऑगस्टच्या दौऱ्यांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

असा आहे दौरा 

 मंत्री श्री.सामंत यांचे दुपारी 12:30 वाजता उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. दुपारी 1 ते  1:30 हा वेळ राखीव असेल. दुपारी  1:30 वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उप-परिसर आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 2 : 15 वाजता विद्यापीठ उप-परिसरातच राष्ट्रीय सेवा योजना कोविड योध्यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 3:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद होईल. दुपारी 3:30 वाजता ते उस्मानाबादहून लातूरकडे प्रयाण करतील.

 
Top