तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजाभवानी मंदिर परिसरातील भिक्षेकरी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व अल्पवयीन मुलांचा भिक्षा मागण्यासाठी वापर करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर यांनी यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशाच्या काना कोपऱ्यातून दररोज हजारो भाविक येतात. देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात अल्पवयीन मुले व मुली भिक्षा मागतात. यामध्ये अंदाजे १३-१५ वयोगटातील मुलामुलींचा समावेश आहे. यामध्ये अनेक अल्पवयीन माता लहान मुलांना घेऊन भिक्षा मागत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. अशा बालकांना भिक्षा मागण्यापासून रोखून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची व त्यांना भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी. मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना भीक्षा मागायला लावून बरेच पालक स्वतः नशापाणी करत लहान मुलांवर देखरेख करत असतात. मंदिर परिसरात आठ ते दहा वर्षाची मुले-मुली स्वतःच्या काखेत झोळी बांधून एक ते दोन महिन्याचे बाळ झोपवून भाविकांना भिक्षा मागत असतात. विशेष म्हणजे दिवसभर झोळीत झोपलेले बाळ कधीच रडत नसल्याने त्या बाळाला काही तरी अंमली पदार्थ देवून झोपवले जात असण्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


 
Top