उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात मुदत संपणाऱ्या नगर परिषदच्या निवडणूकसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे लेखी आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. उस्मानाबादसह राज्यातील 150 नगर परिषद व नगर पंचायतचा प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असणार आहे आता जनतेतून नव्हे तर विजयी नगरसेवक उमेदवार मधुन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नगर परिषद निवडणुकीत महा विकास आघाडी होणार की बिघाडी हे पाहावे लागेल तसेच उस्मानाबादसह अन्य ठिकाणी शहर विकास व इतर स्थानिक विकास आघाडीचे प्रयोग राबविले जाऊ शकतात त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एकास एक लढत होणार असल्याने इच्छुकांनी भाऊगर्दी होणार असुन चुरस वाढणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे , निवडणूक संचालन नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असून नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 41(1) नुसार मुदतपूर्व निवडणूक घेणे गरजेचे आहे.त्यानुसार आता प्रभाग रचना होणार असून यात प्रत्येक प्रभागात 1 सदस्य रचना तयार करण्यात येणार असून प्रभाग तयार करताना 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. कच्चा आराखडा तयार करण्यासाठी 23 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे त्यासाठी 2011 ची लोकसंख्या , नकाशे विचारात घेतले जाणार आहेत.

प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या अंतीम करण्यात येणार असून वाढीव शहर हद्द व इतर भाग यात समाविष्ट केला जाणार आहे.ही सर्व प्रभाग रचना करताना गोपनीयता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभाग रचना तयार झाल्यावर ही माहिती मुख्याधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ कळवायची आहे. प्रभाग रचना , आरक्षण व सोडत कार्यक्रम निवडणूक आयोग यथावकाश कळविणार आहे.


 
Top