तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी घेण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा शासनाची परवानगी तातडीने घेऊन दर्शन खुले करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 राज्याचे माजी परिवहन मंत्री व तुळजाभवानी मंदिर संस्थानचे माजी विश्वस्त चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदनाद्वारे तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे मंदिर शासनाची रीतसर परवानगी घेऊन भाविकांना खुले करावे अशी मागणी केली आहे. तुळजापूर येथील पुजारी वर्ग व येथील व्यापारी वर्ग मंदिर बंद असल्यामुळे खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. या घटकांना दिलासा देण्यासाठी तातडीने दर्शन खुले करून व्यवहार सुरळीत करण्याची गरज निवेदनामध्ये व्यक्त केली आहे. मंदिरावर अवलंबून घटकावर मंदिर बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे कोरोना संसर्गामुळे बंद झालेले २५ जिल्हे  खुले झाले आहेत ही बाब लक्षात घेऊन मंदिर उघडणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांची उपजिविका अवलंबून असल्यामुळे दरमहा दहा हजार रुपये या सर्व कुटुंबांना मदत देण्यात यावी तसेच पुजारी वर्ग व छोटे व्यापारी त्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनामध्ये माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.


 
Top