लोहारा / प्रतिनिधी

 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत जेवळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एका ग्राहकाने ३३० रुपये भरून विमा घेतले होते. मात्र दुर्दैवाने त्या ग्राहकाचा आकस्मित निधन झाल्याने त्याच्या वारसाला विम्याचे संरक्षण रक्कम म्हणून दोन लाख रुपये मिळाले आहेत. शनिवारी (ता.२१) महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जेवळीच्या वतीने संबंधित ग्राहकांच्या वारसांना दोन लाख रुपयाचे चेक सुपूर्द करण्यात आले. 

२०१५ साली केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंमलात आणली. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रतिवर्षी १२ रुपये व ३३० रूपये विम्याच्या हप्ता स्वरूपात बँकेत भरावे लागतात. यासाठी बँकेचा खातेदार असणे आवश्यक आहे. १८ ते ५० वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. १२ भरल्यास अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास एक लाख रुपये तसेच ३३० भरल्यास वर्षाच्या कालावधीत कोणत्याही कारणाने निधन झाल्यास दोन लाख रुपये मिळतात येथील लताबाई व्यंकट राजापुरे यांनी या विमा योजनेअंतर्गत ३३० भरला होता. दुर्दैवाने एक वर्षाच्या कालावधीत त्याचा आकस्मित मृत्यू झाला आहे. आता त्यांच्या वारस पती व्यंकट राजापुरे यांना दोन लक्ष रुपये विमा संरक्षण स्वरूपात मिळाले आहेत. या विम्याची माहीती वारसांना नव्हती. या बँक शाखाचे व्यवस्थापक एच एस सय्यद व अधिकारी महेश पाटील यांनी सदर मयताच्या वारसांना महिती देत रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न केला. शनिवारी (ता.२१) महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जेवळी शाखेत संबंधित ग्राहकांच्या वारसांना शाखेचे व्यवस्थापक एच एस सय्यद यांच्या हस्ते दोन लाख रुपयाचे चेक सुपूर्त करण्यात आले यावेळी सरपंच मोहन पणुरे, सरपंच मल्लिनाथ डिग्गे, पाक मुख्याध्यापक यादव कांबळे, दयानंद भुजबळ आदींची उपस्थिती होती. 

 
Top