उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तब्बल २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पीकविमा कंपनीच्या समवेत पंचनामे सुरू केले आहेत. यामुळे आता कंपनी किती अग्रीम देणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. दुसरीकडे आपत्ती निवारण अंतर्गत महसूल विभाग पंचनामे करणार नाही. यामुळे शासनाकडून मदत मिळण्यासाठी दारे सध्यातरी बंदच आहेत. विमा कंपन्यांचा लहरीपणा पाहता कृषीच्या समांतर पंचनामे होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा केला जातो. यावर्षीही अपेक्षेपेक्षा अधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. यावेळी दोन लाख ४६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणे अपेक्षित होते. मात्र, यापेक्षाही अधिक पेरणी होऊन टक्केवारी १५४ वर गेली आहे. सध्या तीन लाख ७७ हजार ७४२ क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. काही प्रमाणातच शेतकरी पाण्यावर सोयाबीन जगवण्याचा प्रयत्न करतात. जवळपास यातील सर्वच क्षेत्रावरील सोयाबीन पावसावर अवलंबून आहे. तब्बल २१ ते २४ दिवस पावसाने खंड दिल्यामुळे साेयाबीन धोक्यात आले आहे. उत्पादनात घट होण्याची परिस्थिती आहे.