यंदाही कोरोनाचे संकट असल्यामुळे सांजा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी झेंड्याला ऑनलाईन सलामी देउन स्वातंत्र्यदिन साजरा केला. इयत्ता तिसरीच्या उपक्रमशील वर्गशिक्षिका सोनाली गजधने यांनी आयोजित केलेल्या देशभक्तिपर गीतगायन, काव्यवाचन आणि वक्तृत्व अशा विविध कलागुण प्रकारात विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये विद्यार्थी सुजित झोंबाडे, अविष्कार बारखडे, वैष्णवी दाणे, सार्थक सुर्यवंशी वक्तृत्वात तर क्रांती सुर्यवंशी हिने काव्य वाचनात भाग घेतला होता.
यावेळी चिमुकल्यांच्या बोबड्या आणि प्रांजाळ बोलण्यातून स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी ऐकायला मिळाल्या. स्वातंत्र्यवीरांचे स्मरण, असहकार चळवळ, इंग्रजांची गुलामगिरी, शहीदांचे बलिदान असे अर्थपूर्ण शब्द सुध्दा विद्यार्थींनी आपल्या भाषणातून योग्य प्रकारे मांडले. स्वच्छ गणवेश, नीटनेटकेपणा, गळ्यात ओळखपत्र घालून सकाळ पासूनच विद्यार्थी आपल्या पालकांना गीत, कविता, भाषणचे व्हिडीओ काढून वर्गाच्या व्हाटसप ग्रुपवर टाकण्याचा आग्रह धरत होते. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सुध्दा विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाची तीचं हुरहुर आणि तीचं लगबग अनुभवायला मिळाली. यावेळी वैष्णवी दाणे या विद्यार्थीनीने कोरोनामुळे स्वातंत्र्यदिन मुक्तपणे साजरा करता येत नसल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान मुलांच्या कला गुणांना वाव देणारे असे विविध उपक्रम प्रयोगशिल शिक्षिका सोनाली गजधने सातत्याने आयोजित करीत असतात. त्यामुळे सर्व पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीसह शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्याकडून गजधने यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.