मुरूम / प्रतिनिधी 

 मुरूम नगरपालिकेतील गैरकारभाराच्या विरोधात आणि विविध मागण्यासाठी  वारंवार निवेदन देऊन देखील नगरपालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी  दि. १० रोजी पासून आमरण उपोषणाचा अवलंब करण्यात आला आहे. 

यामध्ये नगरपालिकेने दारुबंदीचा ठराव घेऊन शहरातील अवैद्य दारुविक्री बंद करावेत,  प्रधानमंत्री व रमाई घरकुल आवास योजनेतील कपात केलेले पंधरा हजार रुपये लाभार्थ्यांना तात्काळ परत द्यावेत आणि खुले नाट्यगृहाच्या जागी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, शहरातील कन्या प्रशाला नेहरुनगर, महादेव नगर, किसान चौक यासह इतर भागातील सर्व सार्वजनिक

स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी, छत्रपती संभाजीनगर, इंगोले गल्ली, नेहरुनगर या भागात पाणी पुरवठा शुद्ध व सुरळीत करण्यात यावे, शहरातील भुमिहीन शेतमजुर यांना शासन निर्णयाप्रमाणे जॉबकार्ड तात्काळ वाटप करण्यात यावे यासह अन्य मागण्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केल्या आहेत. 

दरम्यान शहरातील भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत मिनियार, भाजपाचे शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, शिवसेनाचे चंद्रशेखर मुदकण्णा, नगरसेवक अजित चौधरी, ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनने उपोषणाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष विठ्ठल पाटील, युवकचे शहराध्यक्ष बाबा कुरेशी, बशीर कागदी, सागर बिराजदार, ज्योतिबा शिंदे, जावेद ढोबळे, बालाजी मंडले, अक्षय शिंदे, शरणप्पा पेटसंगे आदी सहभागी झाले आहेत.  संबंधित प्रशासनाकडून उपोषण कर्त्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असताना मात्र निगरगट्ट प्रशासनाने दिवसभरात वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे दिसून आले उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.


 
Top