उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी  संजय पाटील दुधगावकर यांची निवड केली अाहे. विशेष म्हणजे ही निवड थेट मंुबईतून करण्यात आली. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्षही उपस्थित नव्हते. माजीमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, आ.राणाजगजितसिंह पाटील,खा.ओमराजे यांचा कट्टर राजकीय विरोधक म्हणून दुधगावकर यांची ओळख आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाची अवस्था बिकट झाली आहे.गेल्या महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या स्थितीबाबत आढावा घेतला. एकेकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्रमक आणि पक्षासाठी वेळ देणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची निवड करण्यात आली असावी, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मंत्रालयातील कक्षामध्ये दुधगावकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेख, नानासाहेब जमदाडे, जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण, बिलाल तांबाळी, रणधीर इंगळे आदी उपस्थित होते. केलेली विकासकामे, संजय निंबाळकर यांच्यासाठी घेतलेली मेहनत यांचा या निवडीच्या वेळी विचार झाला.


 
Top