तुळजापुर / प्रतिनिधी- 

 तुळजापूरात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. तसेच राज्यातील रिकव्हरी रेट वाढत आहे. शिवाय राज्यातील २५ जिल्हे पूर्ण पणे अनलाॅक केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.रेस्टॉरंट, बियर बार व दारू दुकाने सुरू असताना मंदिरे बंद का असा सवाल विचारण्यात आला असून लसीकरण केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश द्या, अशी मागणी तुळजाभवानी मातेच्या पुजाऱ्यांनी केली आहे. 

गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाउन आणि निर्बंधामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरातील सर्व व्यवसाय तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहेत. ज्या प्रमाणे राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे मंदिरामध्ये प्रवेशाचेही एक धोरण आखावे. आगामी २० ऑगस्टपर्यंत राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय न घेतल्यास पुजारी बांधव व मंदिरावर अवलंबून असलेले व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्फत मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, कुमार टोले आदी पुजारी बांधव उपस्थित होते. 

 
Top