उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित केले. पक्षनिष्ठा, साधी राहणी, उच्च विचारसरणी, उद्योजकता असे त्यांचे गुण नवीन पिढीने स्वीकारून त्यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन श्रद्धांजलीपर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी हायस्कूल, उस्मानाबाद येथे आयोजित भाई गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी गोरे बोलत होते.

माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील हे सभेचे अध्यक्ष होते. यावेळी बोलताना पाटील यांनी तत्त्वनिष्ठा जपत भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रमाणे जनसामान्यांसाठी धडपडणारा सांगोला भागातील जनतेचा कैवारी, विरोधकच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनाही जनतेच्या भल्यासाठी काम करणारा नेता अशी ओळख असणारे नेते म्हणजे भाई गणपतराव देशमुख होते. असे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमास नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, शेकाप जिल्हा चिटणीस भाई धनंजय पाटील, शेकाप मध्यवर्ती समिती सदस्य अॅड. अविनाशराव देशमुख, नितीन बागल आदींनी भाई गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत या वेळी आपले विचार व्यक्त केले. सदर शोकसभेस उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top