उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोयाबीन पीकावरील मोझॅक या विषाणूजन्‍य रोगापासून सोयाबीन पीक संरक्षण करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने उपायोजना सुचविल्या आहेत.त्याचा उपयोग करावा,असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण )विकास पाटील यांनी केले आहे.

 मोझॅक व्हायरसमुळे रोगग्रस्‍त झाडांच्‍या पानांच्‍या शिरा पिवळया पडतात तसेच फिक्‍कट हिरवे आणि पिवळसर हिरव्या रंगाचे पट्टे पानांवर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्‍ट होतात आणि झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्‍त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान आणि सुरकतलेले असते.त्‍याची उगवण क्षमता कमी होते. साधारणपणे 30 0से. पेक्षा जास्‍त तापमान या रोगास पोषक आहे. या हवामानात रोगाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात.या रोगाचा प्रसार प्रामुख्‍याने मावा या कीडीद्वारे तसेच बियाणेद्वारे होतो.

 यारोगाचे व्यवस्थापन  करण्यासाठी विषाणूविरहित चांगल्‍या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.रोगाची लक्षणे दिसताच विषाणूजन्‍य रोगग्रस्‍त झाडे उपटून नष्‍ट करावीत.विषाणूजन्‍य रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन बियाण्‍यासाठी वापरु नये.या विषाणूजन्‍य रोगाचा प्रसार प्रामुख्‍याने मावा या कीडीद्वारे होत असल्‍याने मावा या कीडींच्‍या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाची 15 मि.ली. 10 लि. पाण्‍यात किंवा इमिडाक्‍लोरोपिड 17.8 टक्‍के एस.एल या कीटकनाशकाची 4 मि.ली. प्रती 10 लि. पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.पिवळा मोझॅक हा विषाणूजन्‍य सोयाबीन पीकावर रोग आहे. तो मूगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो.या रोगाचा प्रसार प्रामुख्‍याने पांढरी माशी या कीटकाद्वारे होतो.

 रोगट झाडांच्‍या पानांचा काही भाग पिवळसर दिसून येतो. ही या रोगाची लक्षणे आहेत.शेंडयाकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. बाधित झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.पाने सुरकतून जातात. फुलांची आणि शेंगाची संख्याही कमी होते. सोयाबीनच्‍या उत्‍पन्नावर रोगाचा विपरीत परिणाम होतो.या रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीटकाद्वारे होतो.

 या रोग व्यवस्थापन करण्यासाठी ज्या पांढ-या माशीद्वारे  त्याचा प्रसार होतो. त्या पांढ-या माशीच्‍या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. डायमिथोएट 30 टक्‍के प्रवाही 10 मि.ली. किंवा मिथील डेमेटॉन 25 टक्‍के प्रवाही 10 मि.ली. 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.रोगाची लक्षणे दिसताच शेतातील रोगग्रस्‍त झाडे उपटून नष्‍ट करावीत.सोयाबीन पीकात आंतरपीक आणि मिश्र पीक घेतल्‍यास रोगाचे प्रमाण कमी आढळते.पिवळे चिकटे सापळे सोयाबीन पीकात हेक्‍टरी 10 ते 12 प्रमाणे लावावेत.

 या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर  या रोगांचा  सोयाबीन पीकावर प्रादुर्भाव दिसताच शेतकऱ्यांनी कराव्यात असेही आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.

 
Top