उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ‘इग्नू’ यांच्याद्वारे प्रस्तावित ज्योतिषशास्त्र या विषयाला विरोध करून या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे गुरुवारी (दि.5) करण्यात आली आहे. 

 निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. पुरोगामी विचारांचे राज्य अशी आपली ओळख आहे. संत चक्रधरांपासून तर गाडगेबाबांपर्यंत प्रबोधनाची दीर्घ परंपरा आपल्याला लाभली आहे. तर दुसर्‍या बाजूने परिवर्तनाची बीजे रुजविणारे फुले शाहू आंबेडकरांपासून प्रबोधनकार ठाकरेपर्यंत अनेक समाजसुधारक या भूमीत होऊन गेलेत. त्याची विवेकवादी व विज्ञाननिष्ठ परंपरा सातत्याने पुढे नेणे, हे महाराष्ट्रातील सुज्ञ तरुणाई आपले कर्तव्य मानते. अशावेळी इग्नूद्वारे या वर्षापासून ज्योतिषशास्त्र या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. 

 जगभरातील 186 खगोलशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी ज्योतिषविद्येला नाकारणारे संयुक्त परिपत्रक काढले होते. या पत्रकावर स्वाक्षरी करणार्‍या अभ्यासकांपैकी 19 नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ होते. ज्याला आधुनिक विज्ञान मान्यता देत नाही, असा ज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे विज्ञानयुगात लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद, वि. दा. सावरकर यांनीही ज्योतिषशास्त्राला विरोध केलेला आहे. ज्योतिषशास्त्राची पदवी देऊन महाराष्ट्रात कर्मकांड करविणारे आणि त्यांच्याकडे आपली बद्धी गहाण ठेवून वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणारी नवी आपल्याला निर्माण करायची आहे का? आपला समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या खाईत ढकलण्याचे हे षडयंत्र थांबवण्यासाठी आपण इग्नूच्या ज्योतिषशास्त्र या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर बालाजी शिंदे, विराज होळकर, अजय पवार, अमर पठाण, अतुल जानराव यांची स्वाक्षरी आहे.


 
Top