उस्मानाबाद / प्रतिनिधी-

निझाम राजवटी खालील मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास सर्वदूर पोहंचवीण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशी मागणी बाबासाहेब परांजपे फौंडेशनने जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. हिप्परगा (ता. लोहारा) येथील शाळेला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्त उस्मानाबादेतील पत्रकार भवन येथे गुरुवारी (दि.5) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फौंडेशनचे मार्गदर्शक पन्नालाल सुराणा यांनी माहिती दिली.यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. हरीष देशपांडे, कोषाध्यक्ष सुरेंद्रसिंह चव्हाण, सचिव भाऊसाहेब उमाटे, डॉ. बी.आर. पाटील, सुर्यकांत वैद्य उपस्थित होते.

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात फौंडेशनने म्हटले आहे. शासकीय स्तरावर हिप्परगा येथे भव्य स्मारक उभारावे, त्या ठिकाणी हैद्राबाद  स्वातंत्र्य लढ्याचा समग्र चित्रमय इतिहास सांगणारा प्रकल्प साकारला जावा. राष्ट्रीय शाळा हिप्परगा आणि हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उस्मानाबाद जिल्ह्याच्या विशेष योगदानासह पुस्तीका प्रकाशीत करावी. या पुस्तीकेचे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ग्रंथालय या ठिकाणी वितरण व्हावे. राष्ट्रीय शाळा हिप्परगाच्या शताब्दी निमित्ताने या शाळेचा समग्र इतिहास सांगणारा माहिती पट तयार केला जावा, राष्ट्रीय शाळा शताब्दी वर्ष व आगामी काळात येणार्‍या हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवा निमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक स्थळावर कार्यक्रमाचे आयोजन केले जावे. मराठवाड्याचा गौरव शाली इतिहास राष्ट्रीय स्तरावर पोहंचवीण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.

फौंडेशनचा उपक्रम

हैद्राबाद मुक्ती संग्रामात मोठे योगदान देणार्‍या हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेचा शताब्दी महोत्सवा निमित्त बाबासाहेब परांजपे फौंडेशन (लातूर) ही संस्था मुक्ती संग्रामाचा इतिहास सर्वदूर पोहंचवीण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त हैद्राबाद संस्थानातील हैद्राबाद, औरंगाबाद, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, गुलबर्गा, मुंबई, पुणे आदी 27 ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. मुक्ती संग्रामात जिल्ह्याचे मोठे योगदान

हैद्राबाद मुक्ती संग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. हिप्परगा (ता.लोहारा) येथे व्यंकटराव देशमुख व अनंतराव कुलकर्णी यांनी दसर्‍या दिवशी 1921 मध्ये राष्ट्रीय शाळा स्थापन केली. या शाळेतच स्वातंत्र्य लढ्याचा पाया घातला गेला. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांचे आगमन या शाळेमुळे झाले. गुंजोटी, अपसिंगा, नळदुर्ग, मुक्तापूर या ठिकाणी महत्वपूर्ण घटना घडल्या मुक्ती संग्रामातील आद्य हुतात्मा वेदप्रकाश यांचे बलीदान गुंजोटी येथे झाले. व लढा सर्वदूर पोहंचला. हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेची इमारत 80 खणाची होती. रजकारांच्या बेबंद कारवाया मुळे ही शाळा 1943 ला बंद पडली.

मुक्ती लढ्याची माहिती नवीन पिढीला व्हावी : सुराणा

हैद्राबाद मुक्ती लढ्याची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे जेष्ठ समाजवादीनेते पन्नालाल सुराणा यांनी सांगितले. ते म्हणाले हैद्राबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटी पासून सहजासहजी मुक्त झाले नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुत्ती दिली. मुक्तीसाठी दोन तीन पिढ्यांनी किंमत मोजली आहे. हिप्परगा येथील शाळेत मातृभाषेतून शिकण्याचा अधिकार असल्याची शिकवण मिळाली. या शाळेतूनच मुक्ती लढ्याची चळवळ सुरु झाली व यशस्वीही झाली. मुक्ती लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व्हावी यासाठी  शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच लोकप्रतिनीधीनींही यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री सुराणा यांनी केले. 

 
Top