उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या माध्यमातून १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठा समाजाचे राजकीय आरक्षण संपवून या समाजाला एक प्रकारे मातीत गाडण्याचे काम केलेले आहे. हे धर्मावर संकट असून जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेंव्हा तेंव्हा कोणीतरी नवीन जन्म घेईल व त्यास मातीत गाडील असे सांगितलेले आहे. त्यामुळे या भाजप सरकारने ओबीसींचे घालविलेले आरक्षण पुन्हा मिळवून न दिल्यास  भाजपला आगामी निवडणुकीत हा समाज मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शंकरराव बोरकर यांनी ओबीसी व्हीजे/एनटी आरक्षण बचाव जागर मेळाव्याप्रसंगी दि.२४ जुलै रोजी दिला. 

उस्मानाबाद येथील यशराज लॉन्स येथे ओबीसी व्हीजे/एनटी आरक्षण बचाव जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. राजेश राठोड, ओबीसी व्हिजे/एनटी आरक्षण जनजागृती अभियानचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, राजाभाऊ मुंडे, नवनाथ पडळकर, रामराव वडकुते, प्रा. सुशिलाताई मोराळे, शिवानंद कथले, धनंजय ओंबासे, खलिफा कुरेशी, रंगनाथ दुधाळ, लक्ष्मण माने, धनंजय राऊत, रवी कोरे, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, इम्तीहान बागवान, डॉ. नवनाथ दुधाळ, शरद कोळी, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, प्रकाश राठोड, बबनराव तायवाडे, राजेंद्र राख, बाळासाहेब पांचाळ, अक्षय ढोबळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा आयोगाने अहवाल दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तर तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १६ खासदारांच्या समितीने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी असा अहवाल दिला होता. मात्र याची अंमलबजावणी केली नसून त्या सर्व अहवालास केराची टोपली दाखवली आहे. भाजपची मंडळी अतिशय बुद्धिमान व हुशार असून ती दिलेल्या शब्दाला प्रमाण मानणारी आहे. मग ओबीसी आरक्षणाचा शब्द गेला कुठे ? असा परखड सवालही त्यांनी विचाराला.

 यावेळी प्रा. सुशीलाताई मोराळे म्हणाल्या की, १९३१ साली इंग्रजांनी ओबीसींची जनगणना केली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ३४० कलम घातले नसते तर ओबीसींना  अजिबातच आरक्षण मिळाले नसते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे डोंगराएवढे ओबीसी समाजावर उपकार आहेत. बाळासाहेब सानप म्हणाले की, वाड्या-वस्त्यांवर ओबीसींचे संघटन केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही. केंद्राने ओबीसींची जनगणना न करण्याचा ठराव घेतला आहे. मात्र राज्यातील भाजप ओबीसींना आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडत आहे. त्यामुळे राज्यातील व केंद्रातील भाजप वेगळी आहे का ? असा सवालही त्यांनी केला. 

यावेळी बोलताना  डॉ. नवनाथ दुधाळ , सोमनाथ काशीद , लक्ष्मण माने , खलील सय्यद , सुखदेव भालेकर , नवनाथ पडळकर, शरद कोळी, राजेंद्र राख, बालाजी शिंदे रामराव वडकुते, दादासाहेब मुंडे आदींनी  आपले विचार व्यक्त केले.

 प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा फेटा, शाल व‌ पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवानंद कथले यांनी तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पडळकर यांनी मानले. या जागर मेळाव्यास जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top