उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ४ जुलै रोजी तिसऱ्या अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाइन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन ऑनलाइन घेण्यात येणार आहे. कवी डॉ. अमोल बागूल यांची संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. केंद्रीय समाजकल्याण मंत्री श्री. रामदास आठवले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, परिषदेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा निमंत्रक आहेत.

रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वा. ऑनलाइन समाज माध्यमांवर हे संमेलन संपन्न होणार आहेत. या साहित्य संमेलनासाठी अभामसापच्या जगभरातून विविध शाखांमधून मराठी सारस्वत साहित्य रसिक उपस्थित राहणार आहेत.कविसंमेलन आणि परिसंवाद चर्चासत्रे तसेच विविध साहित्यकृतीच्या पुस्तकांसाठी पुरस्कार असे साहित्य संमेलनाचे स्वरूप आहे.

कवी, लेखक, साहित्यिक म्हणून डॉ. बागूल यांच्या काव्यलेखन, कथालेखनाच्या माध्यमातून अनेक साहित्य कृती दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके व दैनिकातून प्रकाशित झाल्या आहेत. साहित्यनिर्मितीसाठीचे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत.दर्जेदार साहित्य निर्मितीच्या माध्यमातून डॉ. बागूल यांचे अनेक संशोधनात्मक शोधनिबंध, पुस्तक समीक्षणे नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत.नाटक, लघुपट, माहितीपटासाठी संहिता लेखन तसेच अनेक साहित्यिक कार्यक्रमांची सूत्रसंचालने डॉ. बागुल यांनी केली आहेत. बागूल वेबसाईटच्या माध्यमातून साहित्यिक उपक्रमांना चालना, पाठ्यपुस्तकातील कवितांचे सार्वजनिक ठिकाणी गायन, ऑनलाइन तथा ऑफलाइन पद्धतीने अनेक देशांमध्ये बागूल यांनी या कवितेचे कार्यक्रम संपन्न केले आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातील तसेच जगातील विविध देशातील मराठी भाषिकांसाठी तसेच कवी, लेखक, साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून भारतातील तथा जगातील मराठी भाषिक, रसिक, वाचक, प्रेक्षकांसाठी विविध कवी संमेलने, साहित्य संमेलने, परिचर्चा, परिसंवाद, साहित्यकृतींसाठी पुरस्कार, पुस्तक निर्मिती, ग्रंथ प्रकाशन, ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवले जातात. या संमेलनास ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आवाहन आहे.


 
Top