उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दर तीन-चार वर्षांनी जिल्ह्यात दुष्काळ पडतो. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या परिस्थितीवर मात करीत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत राज्यांमध्ये जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मलाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे. त्याच्या उत्पादनास योग्य भाव मिळाला तर तो सधन होईल.तो सधन होणे आवश्यक आणि गरजेचे आहे. कारण शेतकरी जोपर्यंत सधन होत नाहीत, तोपर्यंत कुठलाही देश सधन होऊच शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी  आज येथे केले.

जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निर्मित कृषी दिन साजरी करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्ता साळुंके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रत्नमाला टेकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे,जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.टि.जी. चिमनशेटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक डी.बी. रितापुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर, पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव, आत्मा प्रकल्पाचे संचालक जे.पी. शिंदे, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य सचिन सूर्यवंशी, शास्त्रज्ञ गणेश मंडलिक, श्रीकृष्ण झगडे, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद आदी उपस्थित होते.

 शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर शेती कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. शेतकरी सधन झाला पाहिजे. यासाठी जि.प.च्या सेस फंडातून 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनीही बीज प्रक्रिया केल्यास इतर बियाणांवर अवलंबून रहावे लागणार नाही.तसेच उत्पादन खर्च आपोआप कमी होईल. शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय शेती करावी, असे आवाहनही श्रीमती कांबळे यांनी यावेळी केले.

 शेती उद्योगाबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तर लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद होते. मात्र फक्त शेती हाच एकमेव व्यवसाय सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान शिकून घ्यावे, असेही आवाहन श्रीमती कांबळे यांनी यावेळी केले.

 जिल्ह्यातील कृषी अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करीत असल्यामुळे गेल्या 4-5 वर्षात गुणवत्ताधारक आणि जास्त उत्पादन शेतकरी घेत आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला मार्केट उपलब्ध व्हावे,यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये शेतकरी क्लब तयार करण्यात येणार आहे.त्याबरोबरच प्रत्येक गटामध्ये  वेअर हाऊसही प्रायोगिक  तत्वावर उभा करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.तसेच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री.दत्ता साळुंके त्यांनी दिले.

 अनिलकुमार नवाळे म्हणाली, रासायनिक पद्धतीच्या शेतीमुळे विविध रोग होतात. ते टाळण्यासाठी विषमुक्त शेती करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा लागणार आहे. तसेच कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी ठिबक, तुषार सिंचनाचा वापर केला पाहिजे. जिल्ह्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून परसबाग मोहीमही अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

 आधुनिक पद्धतीच्या शेतीमध्ये वसंतराव नाईक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनीच राज्याला अन्नधान्यामध्ये समृद्ध केले आहे. त्यांची नाळ शेतीशी जुळलेली होती. पाऊस पडला की मंत्रालयात पेढे वाटणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती होती असे सांगून श्री.घाटगे म्हणाले कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतीशाळा, प्रशिक्षणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब यासह शेतीशी निगडित असलेल्या विविध योजनांची जनजागृती करण्यावर भर दिला जातो. बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचेच बियाणे बीज प्रक्रिया करून वापरावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविल्यामुळे या खरीप हंगामात त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी वापर केला आहे. बीबीएफ पीक पद्धतीचा देखील बऱ्यापैकी अवलंब केला जात आहे. आगामी तीन-चार वर्षांत संपूर्ण जिल्हाभरात बीबीएफ पद्धत अवलंबिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  यावेळी जिल्हा कृषी अधिकारी राठोड व पुरस्कार प्राप्त शेतकरी सतीश खडके, रेवणसिद्ध लामतुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन जिल्हा कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी  केले तर उपस्थितांचे आभार डॉ.टी.जी. चिमनशेटे यांनी मानले.

 या शेतकऱ्यांना केले सन्मानीत

 राज्य शासनाच्यावतीने जाहीर झालेल्या वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार तात्यासाहेब तुळशीराम गोरे, वसंतराव नाईक कृषीमित्र पुरस्कार मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे (२०१८) तर वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कार चौरंगनाथ भीमराव वाघमोडे, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार सतीश विठ्ठल खडके (२०१९) तसेच रब्बी पीक स्पर्धा २०२० मधील सोमनाथ बाबुराव मुंडेकर, राजेंद्र ज्ञानदेव चव्हाण, निलेश यादव खामकर, दादा रंगनाथ काळे, मोहन हरिश्चंद्र मगर, बाळासाहेब आप्पाराव मुंडेकर, तुकाराम दिगंबर पिंगळे, सुधीर मोहन कदम व रेवणसिद्ध लामतुरे यांचा प्रमाणपत्र, वृक्षाचे रोपटे, फेटा व श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमास कृषी विभागाचे तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 
Top