उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भविष्य काळाचा विचार करता बांबूची शेती ही सर्वार्थाने फायद्याची ठरणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.बांबू लागवड, त्याचे फायदे, बांबू लागवडीचे तंत्रज्ञान यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पाशा पटेल बोलत होते. पाशा पटेल म्हणाले की २०१५ साली झालेल्या पॅरिस कराराने भूगर्भातील दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या ज्वलनास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याऐवजी जमिनीवर उगवलेले शेतातील उत्पादन जाळता येऊ शकते. या करारातील तरतुदींचा विचार केला तर आगामी काळात परळी येथील थर्मलमध्येही दगडी कोळसा जाळता येणार नाही. त्याऐवजी बांबूचा वापर करता येऊ शकतो. एकट्या परळी थर्मलचा विचार केला तर त्यासाठी किमान २ लाख एकर बांबूची गरज लागेल, असेही ते म्हणाले.

 पाशा पटेल यांनी सांगितले की, बांबूपासून इथेनॉलची निर्मितीही केली जाते. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिसळले जात असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हे प्रमाण २० टक्के करण्यास परवानगी दिली आहे. २०२७  पर्यंत वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालवली जातील. आजघडीला बांबूपासून फर्निचर, ब्रश, कपडे, लोणचे अशा असंख्य वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यामुळे बांबू हा कल्पवृक्षच आहे. भविष्यात बांबूची मागणी वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

 पाशा पटेल यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी १०० दिवस पाऊस पडत असे आता केवळ ६० तास पाऊस पडतो. २०३० मध्ये हेच प्रमाण ५२ तासांपर्यंत येऊ शकते. पाऊस पडला तरी आणि नाही पडला तरी विनाश होणार हे यामुळे स्पष्ट आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असल्यामुळे असे होत आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे परंतु आज कोणीही झाडे लावत नाही. वड आणि पिंपळाची झाडे शेतात लावणे शेतकऱ्यांनाही परवडणार नाही.

 प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय धाराशिव येथेदि.२५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता बांबु शेती संदर्भात आयोजित बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, बैठकीत बोलत असताना नितीन काळे म्हणाले की, या दृष्टिकोनातून विचार केला असता बांबू लागवड सर्वार्थाने फायद्याची ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. असे आवाहन पाशा पटेल व  नितीन काळे  यांनी सर्व शेतकरी बांधवाना या बैठकीत बोलताना केले. याप्रसंगी बैठकीत ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, इंद्रजीत देवकते, शिवाजी गिड्डे, राजसिंह राजेनिंबाळकर, पांडुरंग पवार, नाना कदम तसेच धाराशिव तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, बांबू शेती संदर्भात बैठकीस मोठया प्रमाणात उपस्थित होते. 

 
Top