परंडा / प्रतिनिधी : - 

रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून गेल़्या दिड वर्षापासून रूग्णांची अखंडपने व अव्याहतपणे सेवा करणा-या डॉ.संजय ठाकरे यांच्या कार्याचा लौकिक आज सर्वदूर पसरलेला आहे

   गेल्या वर्षी मार्च 2020 पासून कोरोना आजाराने देशभर थैमान घातले अन् सर्वत्र हाहाकार उडाला. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या शहरांमध्ये पॉझिटीव्हीटी रेट वाढू लागल्याच्या भितीने शहरांमध्ये राहत असलेली गावखेड्यातील अनेक तरूण मुले, अनेक कुटूंबे गावाकडे परतू लागली. पण वर्षभराच्या काळात कोरोनाने ना शहर सोडले ना खेडे ! खेड्यामध्ये  कोरोनाने हातपाय पसरले अन् खेड्यातील लोकांची कोरोनाविरूध्दची लढाई सुरू झाली. अपु-या  आरोग्याच्या सुविधा,आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव साक्षरतेचे कमी प्रमाण, कोरोनाबद्दल अनेकांच्या मनामध्ये असलेले समज व गैरसमज अशा मध्ये ग्रामीण भाग अडकलेला असताना याच गावखेड्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी देवदूतासारखे धावून आलेले डॉक्टर म्हणून डॉ. संजय ठाकरे यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.

  डॉ.संजय ठाकरे हे परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी आरोग्य केंद्रात समूदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चिंचपूर(बु) ,ताकमोडवाडी, देवगाव (बु) ,पांढरेवाडी, लंगोटवाडी, सक्करवाडी, धोत्री अशी अनेक गावे येतात. या सर्व गावातील नागरीकांचे आरोग्य सुरक्षित रहावे, लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हे अवलिया डॉक्टर रात्रंदिवस स्वत:ची व कुटूंबाची काळजी न करता गावे व समाज सुरक्षित राहीला पाहीजे यासाठी सेवा करत आहेत. स्वत:ला कोरोना झाल्यानंतर त्यातूनही बरे होऊन डिस्चार्ज मिळालेनंतर लगेच 11 व्या दिवशी कामावरती

रूजू झाले.तोच घरी वृध्द असणा-या वडिलांना कोरोनाची लागण झाली.अशाही अवस्थेमध्ये एका बाजूला पितृ सेवेसोबत ,परंडा येथे कोविड केअर सेंटरला ड्यूटी व गावागावांमधील विविध रूग्णांची सेवा हा समाजसेवेचा वसाही तितक्याच ताकदीने पेलला.

   कोरोनाच्या लाटेला परतवून लावणेसाठी त्यांनी होम आयसोलेशन मध्ये असणा-या रूग्णांच्या घरी भेटी देवून पोस्ट कोविड कॉम्पिकेशन्स बाबत योग्य ते उपचार केले. घरातील व संपर्कात आलेल्यांच्या टेस्ट करून घेतल्या अशा प्रकारे गावागावांमध्ये रँपिड अँन्टीजन टेस्ट चे कँम्प आयोजित करून आत्तापर्यत त्यांनी 1181 टेस्ट केल्या आहेत. लसीकरणासाठी नागरीकांमध्ये विविध प्रकारची मत मतांतर असताना गावागावांमध्ये प्रबोधन करून, नागरीकांना प्रवृत्त करून हजारो नागरीकांचे लसीकरण करून घेतले.अनेक ठिकाणी लोक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत हे गावागावांचे चित्र असताना या ठिकाणी मात्र डॉ. संजय ठाकरे यांच्या आवाहनाला व त्यांच्या अखंड सेवा सातत्य व परिश्रमाला प्रतिसाद देत लोक पुढे येऊन लसीकरण करून घेत आहेत. एप्रिल मध्ये 35% असलेला पॉझिटीव्हीटी रेट गावागावांतील जागृतीमुळे व अथक अशा प्रयत्नांमुळे सध्या 0% झाला आहे.   अनेक वेळा समाज मनाला देवाचे अस्तित्व कोठे शोधायचे ? असा प्रश्न पडतो .पण ,संकट काळामध्ये सकल मानवांच्या संरक्षणार्थ धावून येणारे हे कोविड योध्दे देवापेक्षा काही कमी नाही अशी भावना आज समाजातून व्यक्त होत आहे.

  प्रतिक्रिया - 

प्रामाणिक सेवा बजावणारे डॉक्टर्स, नर्स, परीचारीका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, शिक्षक, ग्रामसेवक, समाजातील विविध सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे आपण कोरोना प्रादुर्भाव कमी करू शकलो आहोत.येत्या काळामध्येही हाच समन्वय राहीला तरच कोरोनावर विजय शक्य असल्याचे डॉ. संजय ठाकरे यांनी सांगितले.

 
Top