पीसीपीएनडी कायद्यांतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणे व अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची माहिती देणाऱ्यांना राज्य शासनातर्फ खबरी योजना राबवली जाते. या योजनेत बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुपीत ठेवले जाते, डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी सांगितले.

  जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत डॉ. पाटील यांनी माहिती दिली. बैठकीला अशासकीय सदस्या वैशालीताई मोटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख,डॉ.सचिन बोडके,वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी, डॉ.अनुराधा गरड, डॉ.शहापूरकर,डॉ.अनिल चव्हाण,डॉ.दाबके,जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड.शरद जाधवर आदींसह सदस्य उपस्थित होते.

 बैठकीमध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत उपाययोजना, अवैध गर्भपातास प्रतिबंध करणे, कार्यशाळा आयोजन, डिकॉय केसेसबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावर असणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत श्रीमती मोटे यांनी आश्वासन दिले. जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांची माहिती लेखी स्वरुपात किंवा हेल्पलाईन नंबर-१८००२३३४४७५ अथवा वेबसाईट www.amchimulgi.gov.in यावर संपर्क साधावा.    सूत्रसंचालन नोडल ऑफीसर डॉ.दत्तात्रय खुणे यांनी केले तर आभार अॅड.रेणूका शेटे यांनी मानले.

 
Top