उस्मानाबाद/ प्रतिनिधी

केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना असंघटीत,नोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  राबविण्यात येत आहे.2020-21 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत ही योजना एक जिल्हा एक उत्पादन  (ODOP)  या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजनेची माहिती https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page या संकेतस्थळावर उपलबध आहे.

 उस्मानाबाद जिल्हयासाठी  कडधान्य पिकांसाठी ही योजना मंजूर असून या योजनेंतर्गत अन्नप्रक्रीया उद्योगासाठी तसेच समाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान,ब्रडींग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान,स्वंयसहाय्यता गटांना बीज भांडवल तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद याप्रमाणे चार लाख रुपायांपर्यत अनुदान देय राहील. या योजनेंतर्गत  शेतकरी उत्पादक संघ,शेतकरी उत्पादक कंपनी,संस्था,स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक तसेच शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इ. घटकांना लाभ घेता येईल.तसेच या घटकांतर्गत नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उत्पादनावर देता येतील.तसेच कडधान्य पिकांव्यक्तीरिक्त (NON-ODOP) सद्यस्थितीत आस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी,स्थरवृध्दी,आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्ताव देखील योजनेमध्ये सादर करता येतील.

 सद्यस्थितीत वैयक्तीक सुक्ष्म उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर http://pmfme.mofpi.gov.in/ या ऑनलाईन पध्द्तीने अर्ज सादर करावयाचा आहे. गट लाभार्थींना ऑफलाईन पध्द्तीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज  निश्चित केलेल्या एक जिल्हा एक  उत्पादनासाठी सादर करता येईल.

 या योजनेसाठी 2021-22 करीता  सर्वसाधारण प्रवर्गासाठी-130,अनुसुचित जाती-12 आणि अनुसुचित जमाती तीन असा एकूण 145 प्रकल्पांचा लक्षांक प्राप्त झालेला आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री.मंगरुळे (भ्रमणध्वनी क्रमांक -9420688527 ) किंवा उस्मानाबाद जिल्हयाकरीता जिल्हासंसाधन व्यक्ती श्री.शिंदे (भ्रमणध्वनी क्रमांक-8459458131) यांच्याशी संपर्क करावा. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी  उमेश घाटगे यांनी केले आहे.  


 
Top