उमरगा / प्रतिनिधी-

उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे १ कोटी २० लक्ष रुपये खर्चून ६०० एलपीएम  क्षमतेचे ऑक्सिजन टॅक उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्लॅंट हा दोन ते तीन आठवड्यात चालू होणार असल्याची घोषणा करण्यात आली पण सहा आठवड्यात या कामाबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी तरी हा प्लॅट उभारणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उमरगा व लोहारा तालुक्यात मागील एक वर्षापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु आवश्यक क्षमतेच्या तुलनेत ऑक्सिजन साठा कमी पडत असल्याने अनेक रूग्णांची गैरसोय होत असल्याने उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दररोज १२५ जम्बो सिलेंडर भरण्याची क्षमता असलेले १ कोटी २० लक्ष रुपये खर्चून ६०० एलपीएम  क्षमतेचे ऑक्सिजन टॅंक उभारणीबाबत मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्लॅंट हा दोन ते तीन आठवड्यात चालू होणार असल्याची घोषणा आ. ज्ञानराज चौगुले यांनी २४ एप्रिल रोजी केली होती. सदरची घोषणा होऊन सहा आठवडे उलटले परंतु उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सीजन टॅंक उभारणीचे कामात कोणतीही कारवाई झालेली नाही. कामाचे अटी व शर्तीमध्ये एक महिन्याच्या आत कामाला सुरुवात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु दिड महिन्यात कामाबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. काम घेतलेल्या एजन्सीने उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी सुध्दा केलेली नाही. यामुळे काम होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. रुग्णसंख्या दरदिवस कमी होत आहे. नविन रुग्णापेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही जमेची बाजू असली तरी तज्ञांनी सुचवलेल्या तिसऱ्या कोरोना लाटेपूर्वी सदरचा प्लॅंट कार्यान्वित होणे गरजेचे आहे.


 
Top