उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खरीप हंगामापासून पुर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले तर उत्पादकता वाढणार आहे. यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी सहभागासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे केले आहे.

  राज्यामध्ये पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते,अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास,त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.या सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.

 पीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके - भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत.प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या-सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5.पीकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पीकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या - सर्वसाधारण गटासाठी 05 व   आदिवासी गटासाठी 04. स्पर्धेत भाग घेणा-या शेतकर्यातला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

  प्रवेश शुल्क - सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 रुपये.

 अर्ज दाखल करण्याची तारीख-  मूग व  उडीद पीक-31 जुलै. भात, ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल - 31 ऑगस्ट.पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  7/12, 8अ चा उतारा जात   प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात द्यावे.

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप –

स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये पुढीलप्रमाणे:-

तालुका पातळी-पहिले- 5 हजार, दुसरे 3 हजार, तिसरे-2 हजार. जिल्हा पातळी-पहिले-10 हजार, दुसरे-7 हजार, तिसरे-5 हजार.विभाग पातळी-पहिले-25 हजार,दुसरे-20 हजार ,तिसरे-15 हजार.राज्य पातळी-पहिले-50 हजार, दुसरे-40 हजार, तिसरे-30 हजार.

 पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

रब्बी हंगाम 2020 मध्ये पिक स्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलैपूर्वी तर इतर खरीप पीकांसाठी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.


 
Top