उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. प्रदेश सरचिटनीस आ.सुजितसिंहजी ठाकुर व आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार या वर्षी ही कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करुन २१ जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील सर्व ठिकाणी योग शिबिरांचे कार्यक्रम होणार आहेत . या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपचे उस्मानाबाद  जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांनी केले. 

योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन सिद्ध झाले असून भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास २०० देशांनीही स्वीकारली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते. त्यामुळे आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे योग शिबिरे आयोजित करण्यात येणार असून ऑनलाईन तसेच सार्वजनिकरीत्या आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये नागरीक व लोकप्रतिनीधी सहभागी होणार आहेत. योगविद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी सहभागी होणारे नागरीक, लोकप्रतिनिधी व सर्वजण योग शिबिरातील किंवा वैयक्तिक योगसाधनेची छायाचित्रे व व्हिडियो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणार असून राज्यभर योगदिनाच्या उत्साहाचे अभूतपूर्व दर्शन घडवितील.

भारताला हजारो वर्षांची योगाभ्यासाची परंपरा असल्याने या दिवशी जगभर योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला व जगातील सुमारे २०० देशांनी तो स्वीकारला. एकाच वेळी जागतिक पातळीवर साजरा होणारा योग दिन हा अलीकडच्या काळातील वैश्विक सहमतीचे प्रतीक ठरला असल्याने, योगाभ्यासाचा जनक असलेल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे, असेही भाजपाचे उस्मानाबाद  जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांनी म्हणाले.

 
Top