उस्मानाबाद / प्रतिनिधी 

उस्मानाबाद   तालुका क्रिडा संकुल निर्मितीकरिता उस्मानाबाद औद्योगिक (MIDC) क्षेत्रातील जागा मिळणेबाबत राज्याच्या उद्योग, पर्यटन, क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हयाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आढावा बैठक संपन्न झाली.

उस्मानाबाद   शहरात क्रिडा प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे जिल्हा क्रिडा संकुलाची जागा अपुरी पडत असल्याने तालुका क्रिडा संकुलाची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. तालुकास्तरीय क्रीडा संकुल असावे याबाबत अनेक क्रीडा प्रेमींची मागणी होत होती. उस्मानाबाद औद्योगिक क्षेत्रातील १६ एकर खुली जागा तालुका क्रीडा संकुलकरिता हस्तांतरित करावी व या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल निर्मितीसाठी मंजुरी देण्यात यावी यासाठी मा. मंत्रीमहोदयांकडे यापूर्वीच निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. आज मुंबई येथे याबाबत बैठक संपन्न झाली.

मा. मंत्रीमहोदयांनी खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत १६ एकर खुल्या जागेचा सविस्तर आराखडा प्रस्ताव उद्योग विभागाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत क्रीडा विभागाने तात्काळ पाठवावा अशा सूचना केल्या.

बैठकीस उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, म.औ.वि.मं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर (ऑनलाईनरित्या), पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा अधिकारी सारीका काळे आदी उपस्थित होते.


 
Top