उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्यभरात मध्ये कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू करण्यात आली आहे. 15 जून ते 15 जुलै 2021 या कालावधीमध्ये राज्यात 2, 63,250 उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार केल्या जाणार असल्याचे उमेद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वसेकर यांनी सांगितले.

 ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्रभरातील उमेद अंतर्गत कार्यरत कर्मचारी व संसाधन व्यक्ती यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय पोषण परसबाग निर्मितीचे तांत्रिक प्रशिक्षण उस्मानाबादचे जिल्हा कृती संगम समन्वयक श्री.गोरक्षनाथ भांगे यांनी दिले.या प्रशिक्षणात दहा हजार पेक्षा जास्त उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्तींनी प्रशिक्षण घेतले.

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या सेंद्रिय पोषण परसबाग विकसन मोहिमेसाठी सात हजार कुटुंबांमध्ये पोषण परसबाग तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉक्टर बलवीर मुंडे यांनी सांगितले.यासाठी जिल्हाभरातील सर्व उमेद स्टाफ व संसाधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण झाले असून गाव पातळीवर कार्यरत चौदाशे संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून 7000 सेंद्रिय पध्दतीने पोषण परस बागांची निर्मिती उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे.

 या पोषण परसबागांच्या माध्यमातून प्रति कुटुंबाचा रसायनमुक्त भाजीपाला वरील वार्षिक सरासरी सहा ते आठ हजार रुपये बचत होणार असून या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सात हजार कुटुंबांमध्ये कमीत कमी 4 कोटी 20 लाख रुपयाची वार्षिक बचत होणार आहे.तसेच या पोषण परसबागा च्या माध्यमातून पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाला मुळे कुटुंबांचा,स्तनदा,गर्भवती, किशोरी मुली यांचा आरोग्याचा स्तर उंचावला जाणार आहे.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड व प्रकल्प संचालक अनिल कुमार नवाळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सदरहू मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.उस्मानाबाद जिल्ह्याने केवळ आपल्या जिल्ह्यातच नाही तर औरंगाबाद नगर नाशिक नागपूर या जिल्ह्यातील दीड हजार पेक्षा जास्त समुदाय संसाधन व्यक्तींना या आठवडाभरात ऑनलाइन प्रशिक्षण दिले असल्याचे व या माध्यमातून इतर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना मदत करत असल्याचे जिल्हा कृती संगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी सांगितले.

 
Top