माधव सूर्यवंशी/संवाददाता
तालुक्यात गेल्या दहा महिन्यात ३५६ जणांचा मृत्यू झाल्या ची नोंद पालिकेच्या विभागात आहे. एप्रिलच्या महिन्यात सर्वाधिक १११ जणांचा मृत्यू झाला तर मे महिन्याच्या २३ दिवसात १४९ मृत्यू झाला असताना उपजिल्हा रुग्णालयात केवळ २४० मृत्यू झाल्याची नोंद असल्याने ११६ जणांच्या मयतांची तफावत दिसून येत असल्याने शासकीय, तालुका प्रशासन मृत्यूचे आकडे झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण २२ हजार १०५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यात ११ हजार २२४ रॅपिड ॲंटीजेन चाचणी व स्वॅबचे अहवाल १० हजार ८८१ चाचण्या घेण्यात आले आहेत. दोन्ही चाचणीत पाच हजार १३७ जण पॉझिटिव्ह आले असून चार हजार ७४९ कोरोनातून मुक्त झाले आहेत. जुलैै २०२० पासून २३ मे पर्यंत पालिकेकडे मृत्यूची नोंद सुरू असून कोविड -१९ नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मागील दहा महिन्यात ३५६ मृत्यू झाल्याच्या नोंदी पालिकेकडे असून त्यात १२४ महिला आणि २३२ पुरुषांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत पालिका कर्मचाऱ्यांनी २५६ मृत्यू झालेले व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात ५३, ग्रामीण भागात १८८, लोहारा तालुक्यात ३८, औसा ६, तुळजापूर १२, निलंगा १५, कर्नाटकातील ३७,अक्कलकोट तालुक्यात चार तर उस्मानाबाद, बार्शी तालुक्यातील दोन असे एकूण ३५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
*तालुक्यातील ५९ गावात झाले मृत्यू...*
तालुक्यातील ११४ गांवापैकी ११० गावात कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी ५९ गावातील व्यक्तींचे मृत्यू झालेत. मुरूम १६, तुरोरी आणि गुंजोटी प्रत्येकी नऊ, दाळिंब आठ, येणेगूर, बलसूर, माडज, तुगांव, नाईचाकुर येथे प्रत्येकी सात, चिंचोली (ज) सहा, कोराळ, कोरेगांव येथे प्रत्येकी पाच, मुळज व कोथळी प्रत्येकी चार, दगडधानोरा, कदेर, एकुरगा, आलुर, जकेकूर, त्रिकोळी, नारंगवाडी, समुद्राळ प्रत्येकी तीन, रामपूर, हिप्परगाराव, सांगवी (भि),कुन्हाळी, येळी, एकुरगावाडी, पेठसांगवी,मातोळा, बेळंब, तलमोड, मळगी येथे प्रत्येकी दोन. सावळसुर, सुपतगाव, चंडकाळ, कवठा, काळनिंबाळा,केसरजवळगा, गुगळगाव, काटेवाडी, भुसणीवाडी, व्हंताळ, महालिंगराय वाडी, डिग्गी, तलमोड, कंटेकूर, नागराळ, बोरी, एकोंडी (ज), सुंदरवाडी, आष्टा जहागीर, पारसखेड,कोरेगांववाडी,नाईकनगर, मानेगोपाळ, कसगी, बेटजवळगा, दाबका या गावात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
*कोविड उपजिल्हा रुग्णालयात सर्वाधिक २४० जण मृत्यू झाले असून शहरात आठ खाजगी कोविड सेंटर रुग्णालय येथे ११४ मृत्यू झाले असून एकूण दहा महिन्यात ३५६ जण मयत झाले आहेत. एप्रिल महिन्यात १११, मे महिन्यात २३ दिवसात १४९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाविषाणू संसर्गाने दोन महिन्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असताना यात ह्रदयविकाराच्या झटक्याने अनेकांना मृत्यू झाला. त्यामध्ये सर्वाधिक ५० वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये कोरोना विषयीची भिती निर्माण झाली आहे.
*वैद्यकीय अधीक्षक यांचे कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने तज्ञ डॉक्टर्स नोंदणी घेत असून भूलतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर्स कोविड कक्षात रुग्ण सेवेत असल्याने मृत्यूची संख्या वाढत असून आयसीयू कक्षात तज्ञ डॉक्टर्स असल्यास मृत्यू कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य सुत्राने दिली. ग्रामीण व शहरी भागात सरासरी २० पॉझिटिव्ह येत असलेतरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने उपचारात येणाऱ्यांची संख्या ३७२ असून मयतामध्ये सर्वाधिक जेष्ठ नागरिकांची संख्या आहे. बाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढवून मृत्यू दर कमी होण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय विभागासह आरोग्य विभागाने प्रयत्न करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
*कोविड रुग्णालयात उपचार व अकार्यक्षम, तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचारी अभाव असल्याने मृत्यूची संख्या वाढत असल्याची चर्चा नातेवाईक व नागरिकांतून होत आहे. १५ दिवसापूर्वी कोविड उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका व वार्ड बॉय यांना नातेवाईकानी अरेरावी केल्याची घटना घडली होती. दरम्यान वैद्यकीय अधीक्षकाचे रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांत समन्वय नसल्याने तज्ञ डॉक्टर्स नोंदणी घेत असून भूलतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर्स कोविड कक्षात रुग्ण सेवेत असल्याने मृत्यूची संख्या वाढत असून आयसीयू कक्षात तज्ञ डॉक्टर्स असल्यास मृत्यू दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य सुत्राने दिली.
*उपजिल्हा रुग्णालयातून अर्धवट माहिती*
शहरातील कोविड उपजिल्हा रुग्णालयात शहरातील आठ खाजगी कोविड हॉस्पिटल, तालुका आरोग्य विभाग येथून कोरोनाची माहिती सादर करण्यात आल्यानंतर सविस्तर प्रत्येक दिवसाची माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जात असते, मात्र पत्रकारांना माहिती रिपोर्टींग विभागातून अर्धवट देण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालय अंकाचा घोळ घालत असल्याचे दिसून येत आहे. २३ मेच्या माहिती रिपोर्टींग मध्ये आतापर्यंत पाच हजार १३७ जण पॉझिटिव्ह आले असून चार हजार ७४९ कोरोनामुक्त झाले तर ३७२ उपचारात असल्याचे रिपोर्टनुसार दिसून येते. यावरून असे स्पष्ट होते की केवळ १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे २४० मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आणि रिपोर्टींगमध्ये १६ जण मयत झाल्याचे दिसत असल्यामुळे शासकीय रुग्णालय कोरोनाच्या आकड्याचा घोळ घालत असल्याचे दिसून येत आहे.
*उपजिल्हा रुग्णालयातील रिपोर्टींग विभागात असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण जगताप यांना एकूण रुग्ण, आतापर्यंत कोरोनामुक्त झाले किती, एकूण मृत्यू कीती या बाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की एकूण पॉझिटिव्ह रुग्ण व कोरोनामुक्त याची माहिती ग्रूपवर दिली आहे. मृत्यूची संख्या माहिती ग्रूपवर टाकण्यास वरिष्ठांनी मनाई केल्याने दिली जात नसल्याचे सांगितले.
