शहरातील सराफ व्यापारी अभिजित पेडगावकर यांनी सराफ सुरेश बागडे यांना ५० हजार रुपये दे, अन्यथा तुला चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवणार, अशी धमकी देऊन खंडणी मागितली. याप्रकरणी पेडगावकर यांच्याविरोधात परंडा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २२) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, परंडा शहरातील सराफ व्यापारी अभिजीत पेडगावकर (दहिवाळ) गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ७.३० ते ७.४५ च्या सुमारास सराफ सुरेश बागडे यांच्या घरी गेले व सोने चोरी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अटक केली होती, याची माहिती तूच दिली होती. त्यामुळे माझे खूप नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशच्या केसमध्ये माझा झालेला सर्व खर्च म्हणून मला आत्ताच ५० हजार रुपये दे, अन्यथा तुलाही सोने चोरीच्या गुन्ह्यात अडकवणार आणि तुझा गेम करणार, तुझ्या घरच्यांना देखील माहिती पडणार नाही, अशी धमकी दिली. महाराष्ट्रातीलच नाही तर बाहेरील राज्यातील मोठे गुन्हेगार तसेच पोलिस, मंत्री माझ्या ओळखीचे आहेत. सोन्याच्या धंद्यामधला मी डॉन आहे, तुझा गेम करीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी सुरेश बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित पेंडगावकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाने करीत आहेत.