उमरगा /प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेली ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क जेसीबी तसेच पोकलेनच्या साह्याने रातोरात खोदण्यात आली आहे. व या कामावर बोगस मजुर दाखवून शासनाची व मजुरांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार अचलेर येथील ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अचलेर येथे रोहयो योजने अंतर्गत सार्वजनिक विहीर मंजूर करण्यात आली आहे. ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करुन लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांनी रातोरात मशीनद्वारे विहीरीचे खोदकाम केले आहे. यानंतर बोगस मजूर दाखवून बिल उचलण्याचा प्रयत्न सुुरू आहेे. उपअभियंता यांची यापुर्वीही लोहारा तहसीलदार यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. टाळेबंदीच्या काळात एक तर मजुराच्या हाताला काम नाही रोजगार नाही अशातच अचलेर येथे बोगस कामे करून शासनाची फसवणूक केली जात आहे. संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून बोगस मजूर दाखवून विहीर खोदकाम केली प्रकरण तत्काळ चौकशी करण्यात यावी. बोगस कामाची चौकशी करण्यात यावी व उप अभियंता यांनी अचलेर गावासह परिसरात आजपर्यंत केलेल्या संपूर्ण सर्व कामाचा स्थळ पंचनामा करून दर्जा तपासण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर विकास गोपणे, समर्थ सोमवंशी, सुधीर बंडगर, अतुल सोमवंशी,हिराकांत सोलनकर, गोपाळ राजपूत,भिम सुतार, शक्तीसिंग बायस आदीसह ग्रामस्थांच्या सहया आहेत.