तुळजापूर / प्रतिनिधी : -

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रयत्नातून शहरातील १२४ भक्त निवास येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनचे काम काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी ऑक्सिजनचे १४५ बेड उपलब्ध होणार आहेत. मंदिर संस्थानने ऑक्सिजन पाईपलाईनसाठी तब्बल ३० लाख रुपये खर्च केले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होताच ऑक्सिजन बेड कार्यान्वित होणार आहेत.

जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या पुढाकारातून उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या प्रयत्नातून मंदिर संस्थानने आठवडा बाजार येथील १२४ भक्त निवासातील कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने१५ ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे कोरोना रूग्णांची सोय होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तीन मजल्यांच्या १२४ भक्त निवास येथे एकूण ३०० बेड तयार केलेे. यापैकी पहिल्या मजल्यावर १४५ ऑक्सिजन पाॅईंट काढण्यात आले असून, याचे यशस्वी टेस्टिंग करण्यात आले आहे. तर उर्वरित १५५ साधे बेड असणार आहेत. १२४ भक्त निवास येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पॉइंट काढून चाचणी घेतली.

 
Top