तुळजापूर / प्रतिनिधी : -

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे अवकाळी पावसात वीज पडून शेळ्या राखणारे एक १० वर्षीय बालक दगावले. त्याच्या २६ शेळ्या, दीपकनगर तांडा येथे अन्य तीन जनावरे व सावरगावात एका गायीचाही मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला.

धर्मेंद्र मशाप्पा कोळी (१०) हा काटगाव येथील गट नंबर ४४२ मध्ये शेळ्या चारत होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसात लिंब व चिंचेचा झाडाखाली शेळ्या घेऊन थांबला असता अचानक वीज पडून धर्मेंद्र कोळी व २६ शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

तालुक्यातील दीपकनगर तांडा परिसरात दुपारी ३ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या वेळी शेतात गुरे चारत असलेले शेतकरी सुरेश दगडू राठोड यांची तीन जनावरे वीज पडून दगावली.

तसेच सावरगाव येथील विलास अगतराव फंड या शेतकऱ्याच्या शेतात अवकाळी पावसात वीज कोसळून खिल्लार जातीची गाय जागीच ठार झाली. उमरगा तालुक्यातील बलसूर व कदेर परिसरात बुधवारी दुपारी चारपासून साडेपाचपर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेचा गडगडाट व पावसाने शेतातील काढणीला आलेल्या कलिंगड, कांद्यांचे नुकसान झाले आहे.

 

 
Top