उस्मानाबाद / प्रतिनिधी :

 जिल्हा प्रशासनाने जनतेला कोणतीही पूर्वकल्पना न देताच अचानक शुक्रवारी (दि. १४) रात्री जनता कर्फ्यूची घोषणा केल्याने सर्वसामान्यांचे किराणा मालासाठी हाल होणार आहेत. अगदी किराणा, भाजीपाला विक्रीही आता २३ मेपर्यंत बंद राहणार असल्याने ज्यांच्या घरातीलभाजीपाला, किराणा संपत आलेला आहे अशाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे प्रशासन मधील अधिकाऱ्यांना कोठेही काही मिळते माञ सर्वसामान्य लोकाना अथक परिश्रम  करुन मिळवावे लागते त्या मुळे दोन दिवस अगोदर सकाळी जनता कर्फ्यु कधी पासुन लावणार हे जाहीर करावे अशी मागणी केली जात आहे. 

वास्तविक जनता कर्फ्यू अथवा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यास जनतेचा अजिबात विरोध नाही. तरीही प्रशासन अचानक जनता कर्फ्यू लागू करीत असल्याने जनतेची मुस्कटदाबी होऊ लागली आहे. मागील आठवड्यातही ८ ते १३ मे असा जनता कर्फ्यू शुक्रवारी सायंकाळीच घोषित केला होता. उस्मानाबादेत प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू आहे. 

या दिवशी सर्व आस्थापना बंद असतात. त्यामुळे प्रशासनाला अगदी किराणापासून सर्व आस्थापना बंद ठेवायच्या असतील तर किमान दोन दिवस अगोदर त्याची घोषणा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे घरात आठ दिवस लागणाऱ्या किराणा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांना करता येईल. अगदी राज्य सरकार सुध्दा संचारबंदीची अथवा लॉकडाऊनची घोषणा करताना नागरिकांना अवधी देते. दोन दिवस अगोदर ते घोषणा करतात. असे असतानाही जिल्हा प्रशासनाला मात्र याबाबत विसर पडल्यासारखी स्थिती आहे.

शहरातील मध्यमवर्गीयांतील काही लोक सोडले तर अनेकांच्या घरात आठ दिवस पुरेल इतके जीवनावश्यक अथवा किराणा साहित्य नसते. गरजेनुसार ते खरेदी करीत असतात. त्यामुळे जनतेला वेठीला धरून जनता कर्फ्यू जाहीर करण्याचे प्रकार असेच सुरू राहिले तर ती जनतेसाठी मुस्कटदाबी ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान दोन दिवसांचा अवधी देऊन जनता कर्फ्यूची घोषणा करावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

 
Top