जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर आणि कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व एचडीएफसी बँक सी एस आर यांच्या अर्थसहाय्याने कोरोना समुपदेशन हेल्पलाईनची सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव घेवून या लाटेमध्ये अतिशय सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे त्याच बरोबर जिल्हयात कोविड सेंटर, ऑक्सिजन निर्मिती प्लांट व देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. ग्रामीण भागातील युवक स्थलांतरित होऊन आल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडे आपत्ती व्यवस्थापनातील, सामाजिक, आर्थिक, उपजिविका तसेच विविध विषयातील संशोधन क्षेत्रातील असलेला अनुभव निश्चितच उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासासाठी होईल असे मत व्यक्त केले.
सद्य स्थितीत रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा बरोबरच मनो-सामाजिक समुपदेशनाची गरज आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी, सुविधा यांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी व त्याची माहिती होण्यासाठी या समुपदेशन हेल्पलाईनची गरज असल्याबाबत त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले.
टाटा संस्थेच्या संचालिका प्रो. शालिनी भरत म्हणाल्या की, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेवून रुग्णांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य ही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.या समुपदेशनाच्या माध्यमातून क्षमता बांधणी करून यावर मात करणे शक्य असल्याचे सांगितले.
या प्रसंगी कोहीजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कपूर म्हणाले की, वेगवेगळ्या स्तरावर नागरिकांना जागरूक करण्यासाठी या हेल्पलाईनचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल व या कार्यात आमची टीम उत्तम योगदान देईल अशी ग्वाही दिली. एचडीएफसी परिवर्तन सी.एस.आर. प्रमुख रितेश सिन्हा यांनी या उपक्रमास सर्वोतपरी आर्थिक सहयोग देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रो. रमेश जारे, अधिष्ठाता, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापुर म्हणाले जिल्हयातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत असलेली भिती व त्यामुळे येत असलेले नैराश्य दूर करण्यामध्ये ही हेल्पलाईन महत्वाची भूमिका निभावेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन गणेश चादरे यांनी केला चादरे यांनी समारोपात ज्या ज्या वेळेस आपल्या जिल्हल्यावरती विविध संकटे आली आहेत. त्या त्या वेळेस त्याचे निर्मुलन करण्यासाठी व नागरिकांना विविध माध्यमातून मदत करण्यासाठी टाटा संस्था जिल्हल्याप्रति असलेली सामाजिक बांधिलकी, दाखवली असल्याचे सांगितले उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र अनुभवी व तज्ञ समुपदेशक समुपदेशन सेवा देण्यासाठी नियुक्त केले असल्याचे सांगितले. नागरिकांनी या सेवेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले व कार्यक्रमात सहभागी झालेले निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व तालुक्यातील तहसिलदार, कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट तुळजापूर प्रकल्प समन्वयक दयानंद वाघमारे, एचडीएफसी परिवर्तन सीएसआर प्रकल्प विभाग प्रमुख गजेंद्र दिक्षीत आणि पवन डोंगरे व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक वृंद आणि सर्व समुपदेशक व मान्यवर यांचे आभार मानले.
तालुका निहाय समुपदेशक व हेल्पलाईन नंबर
उस्मानाबाद - श्रीम. सोनाली गुजराथी
7498701779
तुळजापूर - श्री. मनोहर दावणे
8788534770
उमरगा - श्री. किरण कदम
9373827115
लोहारा - श्रीम. शुभांगी कुलकर्णी
8080234324
परंडा - श्री. आनंद भालेराव
7666269617
भूम - श्री. शंकर ठाकरे
7666284303
कळंब -श्री. गणेश चादरे
7666290636
वाशी - श्रीम. सोनाली गुजराथी
7498701779