भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने धरणे आंदोलन

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत येऊन ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या कालावधीत नोटाबंदी, जीएसटी, महागाई व सर्व शासकीय मालकीचे उद्योग व संस्था मोदी सरकारने त्यांच्या अत्यंत जवळच्या उद्योजक मित्रांच्या घशात घालून देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी निर्माण केली आहे. तर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या निकामी ठरलेल्या सरकारने कोणत्याच उपाययोजना न केल्यामुळे देशातील लाखो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३१ मे रोजी जाहीर निषेध करुन हे अपयशी सरकार तात्काळ बरखास्त करावे, अशी मागणी अशी आग्रही मागणी काँग्रेस कमिटीच्यावतीने एका निवेदनाद्वारे दि.३१ मे रोजी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मोदी सरकारने कोरोनि विषाणू सारख्या जीव घेणाऱ्या महामारीला रोखण्यासाठी अत्यावश्यक असणारे लसीकरण देशातील नागरिकांना करण्याऐवजी  देशात तयार करण्यात आलेल्या लसीपैकी जवळ जवळ ६ कोटी लसी विदेशात पाठविलेल्या आहेत. तर औषधे, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर देखील रुग्णालयांना उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे देशातील लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर नोटाबंदी व जीएसटी लागू केल्यामुळे अनेक उद्योग बंद पडले असून अनेकांना त्यांच्या हक्काचा रोजगार गमवावा लागला आहे. तसेच अर्थव्यवस्था केंद्रातील सरकारच्या चुकीच्या  धोरणामुळे पूर्णता ढासळलेली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे जनतेच्या खिशाला कात्री लावून सरकारने मोठ्या प्रमाणात जनतेची आर्थिक लूट केली आहे. विशेष म्हणजे देशात दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याऐवजी  बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणाऱ्या मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. तर उद्योजक मित्रासाठी सार्वजनिक संस्था, उद्योग विक्रीस काढून हम दो, हमारे दो यांचे भले करण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला आहे. यासह इतर सर्व पातळ्यांवर केंद्र सरकार

अपयशी ठरल्यामुळे काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात विविध घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणून निघाला होता. हे आंदोलन काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रदेश महिला उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, ॲड. राज कुलकर्णी, विजय मुद्दे, जावेद काझी, मुनीर कुरेशी, रोहित पडवळ, धनंजय राऊत, नाना निंबाळकर, सलमान शेख, उमेश राजेनिंबाळकर, बाबुराव तवले, प्रणित डिकले, संजय पवार, सुभाष हिंगमिरे, सुर्यकांत पाटील, हरिभाऊ शेळके, मेहराज शेख, अकबर शेख, शामराव भोसले, बाळासाहेब गपाट, ॲड. विश्वजीत शिंदे, ॲड. राहुल लोखंडे,  कृष्णा तवले, भूषण मांडवेकर देशमुख, बालाजी माने, अब्दुल लतीफ, संजय गजधने, स्नेहल स्वामी, स्वामी, शहाजी मुंडे, समाधान घाटशिळे, अविनाश कानवले आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलना नंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.


 
Top