उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच अंगणवाड्या, शाळांची चांगल्या प्रकारे रंगरंगोटी  करण्यात आली आहे. या रंगरंगोटी बरोबरच विविध प्रकारची झाडे लावून या परिसरातील सर्व जागा वृक्षांकित कराव्यात अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी दिल्या.

कोरोणाचा वाढता प्रसार, प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई होत आहे किंवा कसे याची पाहणी करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाशी व कळंब तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. तेथे उपस्थित ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे समवेत काही घरी जाऊन नागरिकांची चर्चा करून माहिती घेतली. नागरिकांना शासकीय यंत्रणा मार्गदर्शन करीत आहेत का,  नागरिकांच्या संपर्कात आहेत  का, आणि नागरिकही नियमाचे पालन करीत आहेत  का, याची माहिती घेतली. नागरिकांनी याबाबत सकारात्मक उत्तर दिले. ही बाब कोरोनाला घालवण्यासाठी मदतीची ठरेल असे फड म्हणाले. या दौऱ्यात त्यांनी काही ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा आणि अंगणवाड्यांना भेटी देऊन तेथील परिसराची पाहणी केली. भेटीत सर्व इमारती रंगरंगोटी करून सुंदर केल्याचे दिसून आले. मात्र या इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करता येण्याची संधी असूनही कमी प्रमाणात वृक्षलागवड केल्याची बाब विचारात घेता, फड यांनी प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यास तसेच जिथे शक्य आहे तेथे परसबाग करण्याबाबत सूचना दिल्या. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांना वृक्ष उपलब्ध करून द्यावीत असेही म्हटले. फड यांचे सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे, गटविकास अधिकारी कळंब श्री राजगुरू व वाशीचे गट विकास अधिकारी श्री खिल्लारे तसेच त्या त्या गावचे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील  उपस्थित होते.

 
Top