उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्याच्या माध्यमातून वृक्षारोपण व कार्यालयाच्या सौंदर्यतेवर कर्मचाऱ्यांनी भर द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमानंतर डॉ. विजयकुमार फड यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संवाद साधला.

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तूबाकले, पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुसर,कृषी विकास अधिकारी चीमन शेटे,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आघाव,प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मोहरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड,कनिष्ठ भूवैज्ञानिक श्रीमती शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कुंभार आदी उपस्थित होते.

      गाव लोकसंख्येच्या तीन पट वृक्ष लागवड मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. गाव निहाय पडीक जमिनी सह शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्ष लागवड मोहीम राबवली जाणार आहे. यासंदर्भात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड म्हणाले की, जिल्हा परिषद अंतर्गत साधारणपणे 15 हजार कर्मचारी प्रत्येक गावनिहाय सेवेत आहेत. सर्वांच्या सहकार्यातून वृक्ष लागवड मोहीम चळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. स्वच्छ सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम ज्या पद्धतीने राबवला जात आहे त्यानुसार गावातील प्रत्येक शिक्षक अंगणवाडी,आशा कार्यकर्ती, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या मदतीने वृक्ष लागवड चळवळीच्या स्वरूपात एक आदर्श असा उपक्रम राबवला जाणार आहे.

      काही दिवसांपूर्वी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वृक्षलागवड  संदर्भात  मोहीम राबवण्याची विनंती केली होती.त्यानुसार आता चतुर्थ श्रेणी किंवा अन्य कर्मचारी संघटनांनी शक्य तितकी झाडे लावावीत त्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी मदत करणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत वृक्ष लागवडीसाठी ठोस कृती कार्यक्रम आणि त्याचे नियोजन केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध वृक्षांची रोपे तयार करण्यासाठी आवश्यक बिया जमा करून रोपवाटिका विभागांमध्ये जमा करण्याची सूचना देखील यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केली.

 
Top