उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 चर्चासत्र या ग्रुपच्या संवादातून व गुगल मिटच्या माध्यमातून आज ऑनलाइन चर्चासत्र पार पडले. माहिती व तंत्र व स्पर्धेच्या युगामध्ये धनगर समाज मुख्य प्रवाहापासून दुर का आहे? याची कारणे कोणती? या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. दरम्यान धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी आपल्या समाजाचे अज्ञान व दारिद्र्य हेच कारण असल्याचे नमूद केले.

यावेळी अनेक जणांनी समाजात वावरत असताना व अभ्यास करत असताना निदर्शनास आलेले अनेक मुद्दे मांडले. यामध्ये प्रामुख्याने अविनाश धायगुडे यांनी, आपल्या समाजनेत्यांच्या नेतृत्व कक्षा रुंदावल्या पाहिजेत, तसेच इतिहासाविषयी प्रचंड अज्ञान असून आपल्याकडे आज देखील कोणताही ठोस असा प्रोग्रॅम नसल्याचे नमूद केले. हर्षद शेजाळ म्हणाले की, प्रस्थापितांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी विविध क्षेत्रे काबीज केली आहेत. मग ते शिक्षण, सहकार, अर्थ, कारखानदारी असतील. यावेळी किरण सोनवलकर यांनी सांगितले की राजकारण व समाजकारण यामध्ये गफलत नसावी आणि प्रत्येक क्षेत्र स्वतंत्र दृष्टिकोनातून पहावे असे नमूद केले. दरम्यान माने यांनी आर्थिक विकासाला महत्व देत आपण आपल्या पारंपारिक व्यवसायात एक मोठी व्यवसायिक साखळी (चैन) उभा करून आर्थिक प्रगती साधता येईल असे सांगत त्यासाठी बकरी बँक ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे सांगितले. दरम्यान आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता आणि सक्षमता हीदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे सचिन सरक यांनी नमूद केले. जागृती, शिक्षणाचा अभाव तसेच तीव्र इच्छाशक्ती या गोष्टी मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाकडे पुरेशा नसल्याचे दाजी कोळेकर यांनी लक्षात आणून दिले. दरम्यान जोतीराम गावडे यांनीदेखील महत्त्वाचे मुद्दे मांडताना राजकीय क्षेत्रात आपण सक्षमपणे उभारण्यासाठी काहीतरी ठोस केले पाहिजे असे सांगितले. 

दरम्यान समाजातील असंघटीतपणा, अल्पसंतुष्टपणा, चुका सुधारणेचा अभाव, लाजरेबुजरेपणामुळे नागरी व कार्पोरेट क्षेत्राशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नाचा अभाव, प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन अभाव, समाजातील नेतृत्वामध्ये रचनात्मक काम करण्याचा अभाव, आजही सामाजिक व राजकीयदृष्ट्या आपले शत्रू कोण? याची निश्चिती नाही. त्यामुळे व इतर अनेक कारणामुळे आपला समाज मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे प्रकर्षाने नमूद करण्यात आले.

दरम्यान धनगर माझा चे संपादक धनंजय तानले यांनी सांगितले, या सर्व कारणा पाठीमागे अज्ञान आणि दारिद्र्य हीच मुख्य कारण असल्याचे नमूद केले. यावेळी पुढील दिशा ठरवण्यासाठी काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्रॅम निश्चित करावा अशा सूचना करण्यात आल्या. याकरिता एक सिस्टम निर्माण व्हावी, यादृष्टीने वेळोवेळी ऑनलाईन मीटिंग आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आणि यातून रचनात्मक समाज घडविण्याचे व बांधण्याचे निश्चित करण्यात आले.

 
Top