उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स येथे शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन यांच्यावतीने व इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सहकार्याने 125 बेडचे जंम्बो कोवीड सेंटर गूरुवारपासुन रुग्णांच्या सेवेसाठी सूरु करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या गृहित धरुन व ग्रामीण भागात वाढत असलेल्या रुग्णांचे प्रमाण पाहता त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत हा उद्देश घेऊन हे कोवीड सेंटर सूरु करण्यात आल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेनेचे उद्देश राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व आहे. 80 टक्के समाजकारणाचे सुत्र मानुन कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत व्हावी यासाठी शिवसेना व पवनराजे फाऊंडेशनच्यावतीने शहरात 125 बेडचे सुसज्ज कोवीड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथील उपचारासाठी आयएमएच्या तज्ञ डॉक्टराचे सहकार्य लाभले असुन रुग्णांना येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले आहे. 

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने १२५ बेडचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले असून त्यापैकी ५० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा देण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दुर करण्यासाठी हे कोवीड सेंटर अधिक उपयोगाची ठरणार आहे. येथे येणाऱ्या रुग्णावर अगदी मोफत उपचार करण्यात येणार आहेत. औषधापासुन सर्व खर्च हे कोवीड सेंटर करणार आहे. शहरात तसेच तालुक्यात असलेल्या रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली असुन अजुनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे, त्याचा विचार करता हे कोवीड सेंटर सामान्य नागरीकांसाठी मोठा आधार ठरेल असा विश्वास खासदार ओमराजे यांनी व्यक्त केला आहे. नागरीकांनी कोवीडचे कोणतेही लक्षण अंगावर न काढता तातडीने तपासणी करुन वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सूरु करावेत असे आवाहन ओमराजे यांनी केले आहे. कोवीड सेंटरच्या उभारणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर व आयएमएचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख यांनी सहकार्य केल्याचे ओमराजे यांनी सांगितले.

 
Top