उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 खरीप २०२१ साठी खते व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. बाजारपेठेत पण त्यासाठी नियोजन सुरू आहे. शासन स्तरावर त्यासाठी वेगवेगळे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत.

    खतांची दरवाढ झाली किंवा नाही झाली याबद्दल सध्या शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण सुरू आहे. केंद्र शासनाने दरवाढ झाली नाही म्हणून सांगितले आहे परंतु बाजारात मात्र वाढीव किमतीचा खत साठा उपलब्ध झालेला आहे. जुना खत साठा भरपूर प्रमाणात शिल्लक आहे तो जुन्या दरानेच विकला जाणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.  शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करताना ई -पॉस मशीनमधून निघणारी छापील पावती न विसरता मागून घ्यावी व जपून पण ठेवावी,कारण भविष्यात काही अडचण आल्यास ती पावती गरजेची असते. पावती वरील छापील किंमत व खताच्या गोणीवरील छापील किंमत याची खात्री करून घ्यावी व मगच दुकानदार यांना पैसे द्यावेत. नवीन वाढीव दराची पावती देऊन खत मात्र जुनेच देणे हा प्रकार होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात आले आहे. खते व बियाणे खरेदी करताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा, हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे अशी माहिती शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी दिली.  

 यासाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.



 
Top