उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
येथील  उस्मानाबाद गुलाब जामुनचे सुप्रसिद्ध हॉटेल मालक उस्मान इस्माईल निचलकर‌ रा. सुलतान पुरा, उस्मानाबाद (वय ६१ वर्ष)  यांचे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दि.९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
निचलकर यांनी लहान वयात हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी स्वतःचे हॉटेल टाकून गुलाबजामुनचा व्यवसाय वाढवण्यासाठी व जिल्ह्याचे नाव लौकीक करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुर्बिन यांच्या गुलाब जामुन नंतर उस्मान यांचे गुलाब जामुनचे नाव सर्वत्र     पोहोचले. त्यांनी हॉटेल व्यवसायात शून्यातून विश्व निर्माण करून उस्मानाबादची ओळख निर्माण केली हे विशेष. गेल्या वर्षभरापासून ते कॅन्सरच्या आजाराशी संघर्ष करीत होते. त्यातच त्यांची  दि.९ एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर येथील प्रशासकीय इमारत शेजारी असलेल्या कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ,बहिणी, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top