उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती खूपच बिकट आहे त्या अनुषंगाने  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्टीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर हा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जिल्ह्यांमध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याने सध्या शासकीय व खाजगी रुग्णालयात बेडचा तुटवडा जाणवत आहे तसेच जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत,  ऑक्सीजन उपलब्ध होत नाही,  रेमडेसीवीर उपलब्ध होत नाही, त्यामुळे जिल्ह्यामध्ये खूपच गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. बघता-बघता जवळची माणसे मृत्यूला कवटाळत आहेत.अशा परिस्थितीमध्ये खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे .

तसेच  प्रत्येक तालुक्यात जम्बो कोव्हिड सेंटर उभा करावे व त्यामध्ये शासकीय व खाजगी डॉक्टरांची सेवा समाविष्ट करून घ्यावी, ऑक्सिजनचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे प्रत्येक तालुक्यात डी. पी .सी किंवा आमदार निधीतून ऑक्सिजन जनरेटेड प्लांटची उभारणी त्वरित करावी व एल. एम. ओ साठी केंद्राकडे आग्रह धरून जिल्ह्यातील ऑक्सीजन प्लांट साठी पुरवठा करावा, रेमडेसिविर त्वरित उपलब्ध करावी, घरोघरी तपासणीची मोहीम राबवून बाधित रुग्णांना आलगीकरणामध्ये ठेवावे, व्हॅक्सिनेशनसाठी लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करावा, खाजगी फिजिशियनची मदत घेऊन जिल्हा रुग्णालय व तालुका रुग्णालय येथे गंभीर पेशंटला उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावे, प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

या शिष्टमंडळात  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय निंबाळकर,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांभारे,जेष्ठ नेते संपत आबा डोके,संजय दुधगावकर,शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे, बिलाल तांबोळी, लतीफ पटेल आदींची उपस्थिती होती. 

 
Top