उमरगा़  / प्रतिनिधी-

 गादी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कापसाच्या गठ्ठ्याची वाहतूक करणारा ट्रक उलटून त्याला आग लागली. दरम्यान उमरगा अाणि मुरूम अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत कापूस जळून भस्मसात झाला तर ट्रक अर्धवट जळाला. ही घटना बुधवारी (दि.३१) दुपारी साडेचारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बलसूर पाटीजवळ घडली.

हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने गादी तयार करण्याचा कापूस घेऊन धावणारा ट्रक (केए ५६-२२७०) राष्ट्रीय महामार्गावर बलसूर पाटीजवळ उलटल्यानंतर अचानक आग लागली. यामध्ये चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, ट्रक जळत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी उमरगा, मुरुम पालिका अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. माल जळून खाक झाला असून, ट्रक अर्धवट स्थितीत जळाला आहे. तालुक्यात दोन दिवसात वाहनाच्या अागीची ही दुसरी घटना आहे.

मंगळवारी धावत्या दुचाकीला आग लागली होती. ट्रकला आग लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आगीचा भडका कमी झाल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी समयसुचकता दाखवत तातडीने आग विझविल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग लागल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, पोलिस निरीक्षक मुकुंद अाघाव, पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे यांनी भेट दिली. पोलीस कर्मचारी कांतू राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान उमरगा पालिकेची अग्निशमन गाडी बंद पडल्याने पोलिस, नागरिकांना धक्का मारल्यानंतर सुरू झाली. चालक व क्लिनर जखमी असल्याने त्यांची नावे प्राप्त झाले नाहीत. रात्री उशीरापर्यंत सदर घटनेची पोलीसात नोंद झाली नव्हती.

 
Top