तीन दिवसाच्या तपासानंतर मुलीला केले आईच्या स्वाधीन

   


उमरगा़  / प्रतिनिधी-

उमरगा तालुक्यातील कर्नाटक सिमेलगत असलेल्या डिग्गी गावाच्या परिसरात आढळून आलेल्या एक अनोळखी, मुकबधिर मुलीची ओळख पटविण्यासाठी उमरगा पोलिसांने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि दोन दिवसाच्या तपासाअंती बुधवारी (दि.३१) त्या मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

 याबाबत अधिक माहिती अशी की, २९ मार्च रोजी एक अनोळखी, २७ वर्षीय मुकबधिर मुलगी डिग्गी भागात फिरत असल्याचे दिसून आले. डिग्गीचे पोलिस पाटील सिद्राम जमादार यांनी याबाबतची माहिती उमरगा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर त्या मुलीला ठाण्यात आणण्यात आले. या मुलीला बोलता, लिहिता आणि वाचताही येत नव्हते. शिवाय कानडी भाषेशिवाय इतर भाषा येत नसल्याने मुलीचा ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी शहरातील निवासी मुकबधीर  विद्यालयातील शिक्षिका श्रीमती भावना नान्नजकर यांना बोलावून घेतले शिवाय कन्नड भाषा बोलणारे होमगार्ड श्री शेळके, पोलीस पाटील श्री. जमादार यांची मदत घेण्यात आली परंतु फारसा उपयोग झाला नाही. गावाचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीला बोलताही येत नसल्याने त्याचा उपयोग होऊ शकला नाही. तिने केलेल्या खाणाखुणा या आधारावरून ती कर्नाटकातील आळंद किंवा कलबुर्गी येथील असावी म्हणून त्याची माहिती फोटो बॉर्डर पोलिस स्टेशनच्या ग्रुपवर शेअर करण्यात आली. शिवाय कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील मिसींग मुलीचा शोध घेतला. पोलिस हवालदार व्ही. के. मुंडे, कर्मचारी ए .के. गांधले, एस. के. कंदले, पोलिस पाटील श्री.जमादार यांनी त्या मुलीला घेऊन कलबुर्गी व आळंद येथे पाठवून दिले. तिने सांगितलेल्या ठिकाणी नेण्यात आले. परंतु तेथील लोकांसोबत झालेल्या चर्चेत या मुलीला कुणीही ओळखले नाही. शेवटी पोलिसांनी कलबुर्गी येथील अनाथ आश्रमात ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे त्या मुलीला स्विकारले नाही. मुलीच्या  अंगावरील जखमांच्या अनुषंगाने व कोविडची चाचणी लातुर येथे करण्यात आली. शिवाय महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या वस्तीगृहात दाखल करण्याचा प्रयत्न केला असता तेथे त्यांनीही वेगवेगळ्या वैद्यकिय चाचण्या करूनच दाखल करण्याचे कळविल्याने परत त्या मुलीला उमरग्यात आणण्यात आले.

या भागात सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.  मंगळवारी (दि.३०) रात्री उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करीत असताना रुग्णवाहिकेच्या चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीचा तपास लागला. या मुलीचे नावे कावेरी राजकुमार मुत्ते असे असुन ती गांधी चौक, बसवकल्याण येथील असून सध्या ती हिप्परगाराव (ता. उमरगा) येथे रहात असल्याची माहिती समजली. बुधवारी दुपारी कावेरीला तिचा भाऊ अनिल राजकुमार मुत्ते व मावशी यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले. दरम्यान पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलिस अधिक्षक श्री. टिप्परसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी मुकबधिर मुलीच्या गावाचा, नातेवाईकांचा शोध घेण्यात यशस्वी ठरले.


 
Top