उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ब्रह्मतेज सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना महामारीच्या कालावधीत जनतेची खरी सुरक्षा करण्याचे काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शरीराचे तापमान मोजणाऱ्या मशीनसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

ब्रह्मतेज सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साळुंके हे सतत सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अग्रेसर राहून पुढाकार घेतात व घेत आहेत. वर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. या कठीण काळात नागरिकांना सुरक्षा देण्याबरोबरच कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरु नये यासाठी चौकाचौकात उन्हातानात व पावसात भिजत अविरतपणे सेवा बजावणाऱ्या, आपल्या जीवाची व कुटुंबातील इतर सदस्यांची पर्वा न करता अहोरात्र जनतेचे खरे रक्षक म्हणून भूमिका बजावणाऱ्या, सुरक्षा पुरविण्यासाठी सर्वस्व पणाला वाहून घेतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी अत्यावश्यक साहित्याचे वाटप केले. या साहित्यामध्ये ऑक्सिमिटर, थर्मा मिटर, ताप मोजण्याचे गन, वाफ घेण्याच्या मशीन्स, एन - ९५ मास्क व सॅनिटायझर आदी साहित्यांचा समावेश आहे.

आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण यांच्यासह ७३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरील साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी मागील आठवड्यात शाहूनगर, काकडे नगर, नारायण कॉलनी, संभाजी नगर व गालिब नगर या भागातील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना सॅनिटायझर, मास्क व वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप केले आहे. तर या आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, आवश्यकता असेल तरच तोंडाला मास्क बांधून घराबाहेर पडावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सतत स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, त्याबरोबरच दोन व्यक्तींमधील आवश्यक शारीरिक अंतर ठेवण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी ब्रह्मतेज संस्थेचे दत्तात्रय सोकांडे, युवराज राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्तव्य बजावत असताना मयत झालेल्या पोलिस बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 
Top