उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 

सध्या संपूर्ण देशभर कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे.त्यामुळे गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून भक्तांनी सद्यस्थितीत धार्मिक स्थळी जाण्याचे टाळून गर्दी टाळावी,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केले आहे.

 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन करीत आहे. असे असले तरीही नागरिकांच्या पुढाकारा शिवाय या प्रयत्नाला बळकटी येणार नाही.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन केले पाहिजे. या नियमाचा एक भाग म्हणजे गर्दी टाळणे हा आहे. कोरोना महामारी वेगाने पसरत असली तरीही बऱ्याच धार्मिक स्थळावर भाविक लोक मोठ्या संख्येने जात येत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊन कोरोना प्रसारास वाव मिळत आहे. खरे म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला, म्हणौनि अर्जुना मी नसें! ऐसा कवणु ठाव असे ! परी प्राणियांचें दैव कैसे ! जे न देंखती माते !! असे म्हटल्याप्रमाणे ईश्वर चोहिकडे भरून उरला असला तरीही भाविकांकडून त्याच्या नावाखाली धार्मिक स्थळी गर्दी केली जात आहे.  सद्यस्थिती पाहता भक्तांनी आपल्या भावनेला आवर घालून आपापल्या घरी धार्मिक कार्य, भक्ती करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कोरोना प्रतिबंधाच्या सार्वजनिक, सामाजिक कार्यात भक्तांचा हातभार लागेल.  व्यक्तिगत भक्ती पेक्षा सामाजिक तसेच राष्ट्रीय भक्तीस प्राधान्य देणे योग्य असते. धार्मिक गुरूंनी भक्तांना धार्मिक स्थळी येण्यापासून थांबवणे कामी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचेही डॉ. विजयकुमार फड यांनी म्हटले आहे.


 
Top