उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 

सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.नागरिकही योग्य ते सहकार्य प्रशासनास करीत आहेत. असे असले तरीही कोरोना रुग्णांना भेटण्याच्या इच्छेने काही नातेवाईक दवाखान्यात येत असतात आणि त्यांना भेटण्याचा अट्टाहास करीत असतात. अशा नातेवाईकांना समजावण्यात दवाखान्यातील  डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा बराच वेळ जातो. नातेवाईकांनी त्यांच्या रुग्णास फोनद्वारे संपर्क साधावा. आवश्यकतेनुसार कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी मार्फत संदेश द्यावा. जेवणाचा डबा देण्याची इच्छा असेल तर तो डॉक्टर, कर्मचाऱ्या मार्फत पोहोचवावा. कोरोना रुग्णाच्या जवळ जाणे म्हणजे कोरोनाचा प्रसार वाढवण्यास मदत करणे होय.  नातेवाईकांना समजावले असतानाही जर कुणी ऐकत नसेल तर त्यांचे विरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत. कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा भावनेला आळा घालून नातेवाईकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचा वेळ नातेवाईकांना समजण्यात जाणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.सर्व नागरिकांनी कोरोना विषयक नियमाचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यात प्रशासनास सहकार्य करावे. असे डॉ. विजयकुमार फड यांनी तुळजापूर येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन पाहाणी करते वेळेस म्हटले. डॉ.फड यांनी विशिष्ट अंतर ठेवून रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांची कसलीही गैरसोय होणार नाही. याबाबत उपस्थितांना सूचना दिल्या.

  त्यानंतर डॉ.फड यांनी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी फड यांच्यासोबत गट विकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, डॉ. जाधव, डॉ. पंकज घुगे, श्रीमती स्नेहा मोटे, शिक्षणाधिकारी डॉ. मोहरे आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या औषध व साहित्याचा आढावा घेण्यात आला.

 
Top