उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या काही दिवसांपासून शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. काल रात्री उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर, निरामय हॉस्पिटल, व चिरायू हॉस्पिटल, उस्मानाबाद या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी आपत्कालीन परिस्थिती उद्धवली होती. येथे व्हेंटिलेटरवरती अनेक पेशंट असताना ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद व इतर ठिकाणाहून रात्री उशिरा ऑक्सिजनची सोय करून दिली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे भेट देऊन एकंदर स्थितीचा आढावा घेतला. दि.१५ एप्रिल पर्यंत ऑक्सिजन टॅंकचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मागच्या भेटीत तसा शब्द देखील देण्यात आला होता. हा प्रकल्प १०  के एल क्षमतेचा असून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आज आवश्यक त्या परवानग्या व नाहरकत प्राप्त होतील असे अपेक्षित आहे. संबंधितांशी या अनुषंगाने बोलणे झालेले आहे. लिक्विड ऑक्सिजन भरून उद्यापासून हा प्रकल्प सुरु करता येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या लिक्विड ऑक्सिजन बाबतीत देखील निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून त्यात काही अडचणी येत असल्याचे समजल्यानंतर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

त्याचप्रमाणे पीएम केअर फंड मधून जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन त्याचाही आढावा घेतला. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ६० सिलेंडर इतकी असून जिल्हा रुग्णालयात लागणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी १०% गरज या माध्यमातून पुरविली जाणार आहे. हा प्रकल्प देखील येत्या सात ते आठ दिवसामध्ये कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे उस्मानाबाद मधील शासकीय व खाजगी दवाखान्यांना यापुढे ऑक्सिजन ची कमतरता भासणार नाही. 

तूर्त तामलवाडी येथून जिल्ह्यासाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू असून याठिकाणी देखील भेट देऊन यात सुरळीत पणा आणण्यासाठी तसेच काल रात्री सारखी गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी दिलेले उपजिल्हाधिकारी श्री. माने, तहसीलदार श्री तांदळे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. जावळेकर यांना पुरवठ्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी डॉ.धनंजय पाटील, डॉ.सचिन देशमुख, डॉ. मुल्ला, डॉ.गोस्वामी, जि. प. सदस्य राजकुमार पाटील, नितीन भोसले, राजसिंहा राजेनिंबाळकर,  अण्णा लोंढे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


गेल्या तीन दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रेमडीसीविर इंजेक्शन च्या केवळ ३०० वायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व आज अधिकच्या २०० वायल्स अपेक्षित आहेत. हा तुटवडा लक्षात घेता आमदार स्थानिक विकास निधी मधून १००० रेमडीसीविर वायल्स ची सोय करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सुचविले आहे.  तसेच ऑक्सीजन उपलब्धतेच्या अनुषंगाने ओ टू कॉन्सन्ट्रेटर (O२ concentrator) व बाय पॅप मशीन देखील आमदार निधीमधून खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

 
Top